आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्या बनना है

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निल बट्टे सन्नाटा या चित्रपटाचं आग्य्रात चित्रीकरण सुरू होतं. लग्नाच्या वरातीचं दृश्य होतं. एक सतरा-अठरा वर्षांची मुलगी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. शेकडो लोक होते. या मुलीची दखलही कोणी घेत नव्हतं. एका क्षणाला ती इतकी चिडली की, तिने मातृभाषा तेलुगूमधून जोरदार आरडाओरडा सुरू केला. त्याचा अर्थ त्या लोकांना कळला नसणारच, पण भावना नक्की पोहोचल्या. त्यानंतर दिवसाचं चित्रीकरण व्यवस्थित पार पडलं. संध्याकाळी पॅकअपनंतर लाइन डायरेक्टर चित्रपटाच्या दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारी यांच्याजवळ आला नि म्हणाला, ‘आज तक एडी (साहाय्यक दिग्दर्शक) लडकी नहीं देखी थी. लेकिन आज घर जाकर बेटी को सिखाऊँगा, कि क्या बनना है!’
मुली काय करू शकतात, याचं हे छोटंसं उदाहरण. मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील पाच जणींची मनोगतं एेकायला मिळाली. या पाच जणींत एकही अभिनेत्री नव्हती. एक होती दिग्दर्शक, वर उल्लेखलेली अश्विनी. एक होती चित्रपट संकलक, जबीन मर्चंट. एक होती निर्माती, गुनीत मोंगा. आणि दोघी होत्या पटकथाकार, जूही चतुर्वेदी व पुबाली चौधरी. गुनीत मोंगाने सांगितलं की, पैशांबद्दल एका तरुण मुलीशी बोलायला कोणी तयारच नव्हतं होत. जूही, जिने विकी डोनर लिहिला, म्हणाली की, स्पर्म हा शब्द ऐकल्यावरच समोरची व्यक्ती गप्प होऊन जायची, एका मुलीशी या विषयावर कसं बोलायचं, हेच कळायचं नाही कित्येकांना. पुबालीने कबूल केलं की, ती सिगरेट ओढते, शिव्याही देऊ शकते, परंतु तरीही तिच्याकडे एका पुरुष लेखकासारखं पाहिलं जात नाही. जबीनला कायम असा प्रश्न असतो की, ती एक स्त्री म्हणून काही वेगळं करतेय की, बाकी पुरुषांपैकीच एक गणली जाणारेय ती?
मुलींना कायम स्वत:ला सिद्ध करत राहावं लागतं. कुटुंबीय सोडाच, दुरन्वयानेही संबंध नसलेल्यांना उत्तरं देत बसावं लागतं. चित्रपटासारख्या ‘बदनाम’ क्षेत्रातल्यांचीही तीच गत असते.
तरीही मुली नवनवीन वाटा चोखाळायच्या थांबत नाहीत. आणि ते करताना इतर अनेकांना स्फूर्ती देत राहतात. हो ना?
(mrinmayee.r@dbcorp.in)