आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade About Women’s Mental Health, Madhurima

मन मनास उमगत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडे बायांच्या अगदी सहज कळून येणा-या शारीरिक आजारांकडेही दुर्लक्ष करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मानसिक आजार तर फारची दूरची गोष्ट राहिली. डोकं दुखणं, तापाने फणफणणं, पाय/पाठ/कंबर दुखणं, सर्दीखोकला वगैरे प्रकारांसाठी डॉक्टरकडे जाऊन योग्य ते औषध घेणारी मंडळीच एकुणातच कमी. त्यात बायांचं प्रमाण अर्थात क्षुल्लक. जगभरात सगळीकडेच नैराश्य (डिप्रेशन) हा मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा आजार आहे, साहजिकच तो भारतातही आहे. क्षणिक किंवा तात्कालिक नैराश्य आपल्यापैकी अनेकांना येत असते. परंतु ज्याची गंभीर दखल घ्यावं अशा नैराश्याने अनेकांना ग्रासलेलं असतं, त्याच्या छायेतच हे अभागी जीव कसंबसं दिवस कंठत असतात. त्याची दखल घेऊन त्यावर उपचार मात्र फार कमी व्यक्ती करतात, असं अनेक संशोधनांमधून दिसून आलंय.
नैराश्य हा आजार ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित स्त्री वा पुरुष अशा कुणालाही आपल्या काळ्या मिठीत घेऊ शकतो. काही करण्याची इच्छा नसणं, भूक न लागणं किंवा जास्त लागणं, झोप न येणं किंवा जास्त येणं, अशी नैराश्याची काही लक्षणं आहेत. परंतु अनेकदा त्याचे दृश्य परिणाम वेगवेगळ्या शारीरिक आजारांच्या रूपात समोर येतात, उदा. सततची डोकेदुखी, पोटदुखी, वगैरे. यामागची कारणं अनेक असू शकतात. अगदी दारुड्या नव-यामुळेही बायकोला नैराश्य येऊ शकते. सातत्याने टीव्हीवरील मालिका पाहणा-या अनेक व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. मालिकांमध्ये असणा-या सदैव पॉश राहणा-या बाया, चकचकीत मोठाली घरं, गाड्या, वातानुकूलित ऑफिसं, महागडे मोबाइल वापरणारी हायफाय माणसं यांमुळे आपलं जीवन अगदीच फोल आहे, असं वाटूनही नैराश्य येऊ शकतं. अपुरेपण, असमाधान, रितेपण या भावनांनी माणूस घेरून जातो. याकडे विशेष लक्ष देऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेणं आवश्यक आहे.

तरुण मुलामुलींच्या आयुष्यावरही अभ्यास व नोकरी यांच्या दुहेरी ताणामुळे ही कृष्णछाया पडू लागल्याचं या क्षेत्रातल्या मंडळींना लक्षात येऊ लागलंय. समाज आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्यांचे हे ऊर्जेने भारलेले दिवस निराशेने भरून जात आहेत. अभ्यासाचा नैसर्गिक ताण चांगल्या निकालासाठी आवश्यक असतो; परंतु जेव्हा बाहेरच्या घटकांचा अवास्तव हस्तक्षेप होतो, तेव्हा निर्माण होणारा कृत्रिम ताण या युवावर्गाला मोठ्या प्रमाणावर खच्ची करतो.

आजच्या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने हेच सांगणं, की कुटुंबातल्या माणसांची काळजी घ्या, ती आनंदात आणि समाधानात आहेत ना याची खात्री करून घ्या. काही वावगं वाटलं तर दुर्लक्ष न करता योग्य तो उपचार करा. कारण योलो! You Only Live Once.