आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About A Strong Woman And The Art Of Kashida

कर्नाटकी कशिदा मी काढीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी सोलापूरला जाताना ट्रेनमध्ये भेटलेली गीतामावशी. टापटीप साडी नेसलेली, पाठीवर शेपटा, मोजकेच दागिने. बोलण्याच्या ओघात ती म्हणाली म्हणून कळलं की ती सत्तर वर्षांची आहे, नाहीतर जेमतेम साठीची वाटेल अशी. वडील लष्करात असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेली ही आईवेगळी मुलगी. लग्नानंतर दोन मुलगे शाळेत असतानाच पतीची साथ सुटली. हैदराबादेत एका मावशीचा आधार होता म्हणून गीतामावशी तिकडे गेली. तिथे तिने कापडाशी संबंधित कामाचा कारखाना काढला. पंधरा वर्षं भरपूर कष्ट केले. एकटीने राहायची सवय करून घेतली, पण नातलग व इतर परिचित तिच्या लग्नाच्या मागेच लागले. तिने खूप दिवस टाळलं, पण अखेर मुंबईतील एका व्यक्तीशी लग्न केलं, वयाच्या 55व्या वर्षी. त्यामुळे तिला कारखाना सोडून मुंबईत यावं लागलं. इकडे वेळ कसा जाईल याचा अंदाज नव्हता म्हणून तिने एका मैत्रिणीकडून कर्नाटकी कशिदा शिकून घेतला. कशिदा अत्यंत कठीण, वेळखाऊ व सहनशक्तीची परीक्षा पाहणारा भरतकामाचा प्रकार. पण तिने तो आत्मसात केला. इकडे आल्यावर नव्या जोडीदाराशी तारा जुळल्या नाहीत. पण आता हे नातं तोडणं शक्य नव्हतं. या मानसिक तणावाच्या परिस्थितीत कशिदाकामामुळे ती तगून राहिली. पती व सावत्र मुलांकडून होणारी उपेक्षा कशिद्यामुळे सहन करू शकली. यात सृजनाचा आनंद आणि समाधान तर होतंच, पण जगण्याला आवश्यक असं एक उद्दिष्ट तिला मिळालं होतं.
सुमारे दीड महिना, दररोज आठ तास, खपून गीतामावशीची एक साडी भरून होते. अशा अनेक साड्या जगाच्या कानाकोप-यातल्या तिच्या आप्त दिमाखानं मिरवतायत. जणू काही यंत्राने करावं इतकं नेटकं, प्रमाणबद्ध व अप्रतिम रंगसंगतीतलं तिचं काम पाहताना त्या हातांमागे इतकी वेदना आहे, याची जाणीव त्यातल्या फार कोणाला नसेलही. पण त्यामुळेच तिचं आयुष्य सुसह्य झालंय हेही खरंच. मानसशास्त्रही सांगतंच की भरतकाम, विणकाम, चित्रकला आदी छंदांमुळे मनावरचा/मेंदूवरचा तणाव दूर होतो.आता गीतामावशीकडून कशिदा शिकून घ्यायचा विचार आहे. येताय तुम्ही पण शिकायला?