आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Children\'s Education

शिक्षणाची ऐशीतैशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी अंक वाचताना अनेकदा काही तरी खूप महत्त्वाचं हाती लागतं, बरेच दिवस पुरून उरेल असं. आजच्या बालदिनी, हेरंब कुलकर्णी यांचे लेख यंदा तीन दिवाळी अंकांमध्ये वाचले त्यांची आठवण आली. त्यांनी अनेक वर्षं या क्षेत्रात काम केलंय, अनेक ठिकाणी लिहिलंयही. परंतु, या लेखांमधले दोन मुद्दे खूप महत्त्वाचे वाटतात. शाळेत प्रवेश घेणं सोपं आणि शाळा सोडणं कठीण असायला हवं.
रात्रशाळा ही संकल्पना चुकीची आहे.
पहिला मुद्दा वाचला की, लक्षात येतं आपल्याकडे बरोब्बर याच्या उलट परिस्थिती आहे. शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणजे जन्माचा दाखला, पत्ता, मातापित्याचं नाव, त्यांची श्रीमंती, मुलाला गणित, भाषा किती येतंय वगैरे आधी तपासणार. त्या मुला/मुलीला शिकायचंय, हा महत्त्वाचा मुद्दा शाळा लक्षातच घेत नाहीत. आणि शाळा सोडायची म्हटली तर एक दाखला हातात सोपवून त्या मुला/मुलीला निरोप देतात. का शाळा सोडायचीय, पुढे काय करणार, आम्ही काही मदत करू शकतो का, हे प्रश्न फार कमी प्रकरणांमध्ये विचारले जातात. यामुळे काय होतं ते आपल्याला दिसतंच आहे. शाळागळतीचं प्रमाण अजूनही बऱ्यापैकी आहे देशभर. म्हणूनच, प्रवेश देताना त्या मुला/मुलींचं स्वागत व्हायला हवं आणि शाळा सोडणं महाकठीण.

दुसरा मुद्दा रात्रशाळेचा. पटकन मनात येतं, काय गैर आहे रात्रशाळेत? त्या मुलांना शिकायला तर मिळतं. पण नीट विचार केला तर ध्यानात येतं की, मुलांना काम करायलाच लागू नये, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी. रात्रशाळेमुळे आपण या मुलांना काम करायला छुपं उत्तेजनच देतो जणू. रात्री शिकायला मिळतंय ना, मग दिवसा कर की काम, असं सांगतोय त्यांना आपण. शिक्षणाची संधी हवी वगैरे ठीक आहे, पण त्यासाठी ही मुलं काय किंमत मोजतात, याची जाणीव ठेवायला हवी.

बालदिनी नुसती भाषणं ठोकून, निवडक मुलांशी गप्पा मारून, खाऊचं वाटप करून वेळ साजरी करायच्या ऐवजी या दोन मुद्द्यांवर आपण काही तरी केलं पाहिजे. जे हे काम करतायत, त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना बळ दिलं पाहिजे. तरच बालदिनाला अर्थ आहे. होय ना?
mrinmayee.r@dbcorp.in