आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकण्‍याचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज गुरुपौर्णिमा. त्या निमित्ताने आपल्याला आपल्या आयुष्यभरात काही ना काही छोटी-मोठी शिकवण देणा-या गुरूंची आठवण येतेच. कोणाला बालवाडीतल्या ताईंची, कुणाला शाळेतल्या मराठीच्या सरांची तर कुणाला काॅलेजातल्या इंग्रजीच्या मॅडमची. कोणाचे आध्यात्मिक गुरू असतात, कोणाचे वकिलीतले, पत्रकारितेतले, संगीतातले, वगैरे. हे सगळे गुरू म्हणजे एक व्यक्ती असते. हाडामांसाची, जिवंत व्यक्ती. त्या व्यक्तीमुळे आपल्याला काही विशिष्ट क्षेत्रातलं ज्ञान व कौशल्य प्राप्त झालेलं असतं. ते व्यावसाियक क्षेत्रातलं असतं किंवा मानवी व्यवहारासंबंधीचं. आजकाल या अशा माणसांसोबतच एक नवीन अनोखे गुरू आपल्या आयुष्यात आले आहेत, त्यांना रूप- रंग नाही, आवाज आहे कदाचित. त्यांना शरीरही नाही. ते आहेत सायबर गुरू म्हणजेच संगणकाच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही शिकवणारी साॅफ्टवेअर्स वा वेबसाइट्स.

पास्ता करायचाय, आॅनलाइन जाऊन रेिसपीचा व्हिडिओ पाहा. घरच्या घरी रेशमी साडी धुवायचीय, गुगल करून ते शोधा. भरतकाम करायचंय, त्याचा व्हिडिओ शोधून त्यानुसार भरायला सुरुवात करा. How to... याच्यापुढे काहीही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर आज इंटरनेटमार्फत उपलब्ध अाहे. यासोबच आजकाल इंटरनेटचा वापर नवीन भाषा शिकायलाही मोठ्या प्रमाणावर होतोय. जगाच्या पाठीवर कुठेही असा, इंटरनेटवर असलेल्या अनेक उत्तम व व्यावसाियक साइट्सच्या माध्यमातून तुम्हाला हवी ती भाषा शिकणं शक्यच नव्हे, तर सोपंही झालंय. पूर्वी आपण पुस्तकं आणून भाषा शिकायचो. संगणकाचा एक मोठा फायदा असा की, त्याद्वारे तुम्ही उच्चार ऐकू व शिकू शकता. प्रत्येक भाषेतल्या उच्चारांची एक विशिष्ट पद्धत असते, ती वाचून कळत नाही, तर ते शब्द ऐकावेच लागतात. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, जपानी या परक्या भाषाच कशाला, भारतातल्या तामीळ, बांगला, मल्याळम, काश्मिरी, ऊर्दू आदी भाषांचेही स्वतंत्र उच्चार आहेत, ते हे संगणकीय गुरू आपल्यापर्यंत सहज पोहोचवतात. याच वैशिष्ट्यामुळे संगीतही शिकणं संगणकामुळे सोपं झालंय. तर या सायबर गुरूंनाही आज वंदन करूया. आणि सतत काही तरी नवीन शिकत राहण्याचा निर्धार करूया.