आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचन फराळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी संपली, पाहुणे गेले परत, प्रवासाहून परतलो, शाळा-कॉलेजं सुरू झाली पोरांची. आता काय?
आता दिवाळी अंकांचा फराळ. परवडत असतील तर विकत घ्यायचे थोडे अंक. आपले वाचून झाले की मैत्रिणी, शेजारी, वाचनाची आवड असलेले नातलग यांच्याकडे द्यायचे. विकत घ्यायचे नसतील तर सरळ लायब्ररी लावायची दिवाळी अंकांची नि पुढचे तीन महिने मनसोक्त वाचायचे. सर्व वृत्तपत्रांमधून दिवाळी अंकांची ओळख येते आहेच काही दिवसांपासून. त्यामुळे कोणत्या अंकात आपल्या आवडीचं साहित्य आहे, ते माहीत असतं. त्यानुसार अंक वाचणं सोपं जातं. तसं तर कोणत्याच अंकात सगळंच्या सगळं आपल्याला आवडणारं नसतं, पण जास्तीत जास्त वाचणार आहोत, तेच अंक आणलेले बरे.
दिवाळी अंकांची आपली शंभरहून अधिक वर्षांपासूनची परंपरा. नवनवीन लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार या अंकांमधून समोर येत असतात. जसे नवीन लेखक असतात, तसेच प्रतिष्ठित, लोकप्रिय, श्रेष्ठ/ज्येष्ठ लेखकही. अनेक पुस्तकं या अंकांमधल्या लेखांचं संकलन असतात. या अंकांची मुखपृष्ठं हाही कुतूहलाचा विषय. मुखपृष्ठांवर असतात मुख्यत्वे अभिनेत्रींची छायाचित्रं, त्या खालोखाल निसर्गचित्रं व मान्यवर चित्रकारांची चित्रं. व्यंगचित्र मालिका, काही अंकांमधली खिडकीचित्रं, रेखाचित्रं हीदेखील काही वैशिष्ट्यं.
दिवाळी अंक काढतातच का, हा अगदी मूलभूत प्रश्नही अनेक वाचकांना, किंबहुना न-वाचकांना, पडलेला असतो. निव्वळ हौस म्हणून अनेक अंक प्रकाशित केले जातात. लिहिण्याची, इतरांना चांगलं वाचायला देण्याची हौस. यातला आर्थिक व्यवहार काही फायदेशीर असतोच सगळ्यांसाठी, असं नाही. खिशाला चिमटा लावूनही अंक काढले जातात. जे जुने अंक आहेत, ज्यांना प्रकाशन संस्थेचं वा वृत्तपत्रांचं पाठबळ आहे, त्यांच्यासमोर आर्थिक विवंचना नसते; परंतु दरवर्षी इतरांपेक्षा वेगळं, चांगलं काहीतरी देण्याचं आव्हान असतंच.

अनेक महिला दिवाळी अंकांचं संपादन करतात, लिहितात तर अर्थातच अनेक जणी. वाचतात त्याहून अधिक. या संपादक, लेखक, वाचक मैत्रिणींचं मनोगत आजच्या अंकात आहे. जेणेकरून तुम्हालाही लिहावंसं वाटेल, वाचावंसं वाटेल नि कदाचित पुढचा दिवाळी अंकही संपादित करावासा वाटेल. कसा वाटला, ते कळवाल ना आम्हाला?
mrinmayee.r@dbcorp.in