आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौमार्याचा एकतर्फी निवाडा (मधुरिमा)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंजारभाट समाजातील मुलीच्या कौमार्यभंग चाचणीचं प्रकरण उजेडात आल्यानं या विषयावर पुन्हा एकदा नव्यानं चर्चा होते आहे. जातपंचायतीचं कारण पुढं करून अनेक भटक्या जमातींमध्ये यावर पडदा टाकला जात असला तरी शहरी भागांमध्येही याचं अस्तित्व जाणवतं. स्त्रियांसाठी मानहानीकारक ठरणाऱ्या या परीक्षेतून काय साधलं जातं? शिवाय ही चाचणी किती योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक यापेक्षा त्या संदर्भातली वैद्यकीय बाजू काय आहे, हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं नाही का?
संपूर्ण भारतातच कुमारिका फार महत्त्वाच्या मानल्या जातात. कुमारिका म्हणजे जिची मासिक पाळी सुरू झालेली नाही, अशी मुलगी. कुमारिका पूजन हा भारतातल्या बहुतेक सर्व प्रदेशांतल्या सणांचा/उत्सवांचा प्रमुख घटक असतो. या कोवळ्या कुमारिकांसोबत दुसऱ्या कुमारिकांचा विषय तितकाच महत्त्वाचा, परंतु अधिक संवेदनशील आहे, सध्या गाजतोही आहे. या कुमािरकांची व्याख्या थोडी वेगळी आहे. वयात आलेल्या परंतु शरीरसंबंध न केलेल्या मुलीला कुमारिका समजले जाते. विवाहापूर्वी मुलीचा कौमार्यभंग झालेला नाही ना, म्हणजेच तिच्या योनिशुचितेची खात्री करून घेणे अनेकांना आवश्यक वाटते. कौमार्यभंग झाला अथवा नाही, याची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. मग ते कसं ठरवलं जातं? तर ‘पहिल्या’ शरीरसंबंधाच्या वेळी रक्तस्राव होतो की नाही, यावरनं. असा रक्तस्राव व्हायला हवा, याबाबत डाॅक्टरांचं एकमत नाहीच. नाही झाला म्हणजे ती कुमारिका नाही, किंवा झाला म्हणजे ती कुमारिका आहे, असं काहीच निश्चित नाही. तरीही, हे स्त्रियांवर संशय घेण्याचं हे अस्त्र आजही वापरलं जाणारं. ज्या कंजारभाट समाजातील मुलीच्या प्रकरणामुळे ही बाब चर्चेत आली, त्या समाजासोबतच मध्यम वा उच्च मध्यमवर्गीयांमध्येही पत्नी कुमारिका, पवित्र आहे ना, याला महत्त्व आहेच. कंजारभाट वा इतर भटक्या विमुक्त जातीजमातींमध्ये हा प्रश्न खुलेआम चर्चिला जातो, पंचायत या प्रश्नाचं उत्तर देते, तसा शहरी समाजात तो जाहीर चर्चेत येत नसला तरी तो नाहीच, असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात, सुशिक्षित घरांमध्येही लग्न ठरल्यानंतर मुलींकडे कौमार्यभंग झालेला नाही, याचं प्रमाणपत्र मागण्यात येतं. जळगावातल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. सीमा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी किस्सा सांगितला होता. दोन क्रीडापटू मुलींचा. मुली स्पर्धांसाठी बाहेरगावी जातात, त्यामुळे त्यांच्या पावित्र्याबद्दल शंका घेणारे त्यांचे भावी नवरे. ते स्वत: शिकलेले वसतिगृहात राहून, बाहेरगावीच. परंतु, तरीही ही परीक्षा मात्र मुलींनी द्यावी व त्यात उत्तीर्णही व्हावं, ही यांची अपेक्षा. हाच प्रश्न या दोघींनी केला असता तर? कशी केली असती त्यांची परीक्षा? आहे का अशी परीक्षा नवरामुलगा ‘पवित्र’ आहे ना ते निश्चित सांगणारी?
या संबंधात डाॅक्टरांशी बोलल्यावर काही मुद्दे पुढे आले. त्यातून बदलत्या सामाजिक परिस्थितीचा, मूल्यांचा अंदाज येतो. मुंबईतल्या डाॅ. अंजली बापट यांच्या मते, विवाहपूर्व शारीरिक संबंधांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे, त्यामुळे अनेकदा मुलींना स्वत:लाच विवाहापूर्वी कुमारिका आहोत, हे नवऱ्याला पटवून द्यावंसं वाटत. त्यासाठी त्या शस्त्रक्रियाही करून घ्यायला तयार होतात. विवाहपूर्व संबंधांचं प्रमाण वाढलंय, हे नवऱ्यामुलांनाही माहीत असतं, त्यामुळे त्यांना भीती असते भावी बायकोही त्यातलीच आहे की काय, याची.

हे एेकल्यावर काही प्रश्न मनात आले. जर मुली असे संबंध ठेवतात, तर ते कोणाशी? मग ज्या पुरुषांशी त्या असे संबंध ठेवत असतील, त्यांच्या विवाहाच्या वेळी ते काय विचार करतात? त्यांना स्वत:बद्दल अपराधी वगैरे वाटतं का? बायकोची फसवणूक करतोय, असा गंड त्यांना येतो का? तेही एखादी शस्त्रक्रिया वगैरे करून घेतात का? तेही स्वत:ला अपवित्र, अशुद्ध वगैरे समजतात का? काही डाॅक्टरांनी हायमनोप्लास्टी या शस्त्रक्रियेचा या वेळी उल्लेख केला. योनीवरचा अत्यंत पातळ असा पडदा फाटलेला असेल तर ती स्त्री अपवित्र मानली जाते म्हणे. आता हा पडदा लैंगिक संबंधांनी जसा फाटतो तसा काही खेळांमुळे, व्यायामामुळेही फाटू शकतो. तरीही ती अपवित्रच. या शस्त्रक्रियेने हा पडदा पुन्हा जोडला जातो.

यातून हेच लक्षात येतं की, अजूनही एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक वर्तनावर समाज तिच्या नीतिमत्तेचं मूल्यमापन करतो, विशेषकरून ती स्त्री असेल तर अधिकच. अत्यंत खाजगी असं वर्तन अचानक सार्वजनिक होऊन जातं. हेच आपल्याला लैंगिकतेच्या बाबतीतही दिसून येतंच. पुरुषांच्या शुचितेची अशी परीक्षा होऊ शकत असती, तर ते असे वागले असते का, या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट दिलं नाही तरी प्रत्येकाला मनातून ते चांगलंच ठाऊक आहे.
‘अग्निपरीक्षा सीतेची आजही सरली नाही’
प्रशांत पवार यांच्या ‘३१ आॅगस्ट १९५२’ या पुस्तकातील हा संपादित भाग, भटक्या विमुक्त जातीजमातीतली जळजळीत वस्तुस्थिती सांगणारा...
दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले. तिच्या हातावरच्या मेंदीचा रंग खुलला असला तरी चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. कारण, आज मनोमिलनाची रात्र होती. ‘माल खरा निघाला की खोटा’ हा आजवर लग्न झालेल्या प्रत्येक मुलीच्या ‘सुहाग रात’च्या वेळी ऐकू येणारा सवाल तिच्या मनात वादळासारखा घोंगावत होता. अखेर तो क्षण आलाच... तिच्या आईने दीड मीटर लांबीचे पांढरेशुभ्र कापड पंचांच्या ताब्यात दिले. पंचमंडळी वस्तीपासून काही अंतरावर पालांच्या बाहेर बसली होती. काही म्हाताऱ्या बायकांनी तिला हाताला धरून त्या झोपडीत पाठवले. पंच मंडळी पालाच्या बाहेरच पहारा देऊन बसली होती. तिचा नवरा आतमध्ये होता. त्याच्या हातात तेच पांढरेशुभ्र कापड होते... एकीने तिच्या बांगड्या मोजल्या, दोघींनी तिचे एकामागोमाग एक असे सगळे कपडे काढून तिला नग्न केले, व्यवस्थित तपासणी केली. खूपच संकोचलेल्या तिने असे का करता, असे विचारले तेव्हा, हसतच एक बाई म्हणाली, ‘ब्लेड वगैरे लपवलंस का ते तपासत होते...’ सगळ्या बायकांनी मग तिच्या अंगावर पुन्हा कपडे चढवले. त्या झोपडीतून निघून गेल्या. आता झोपडीत त्याच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. क्षणाचाही वेळ न दवडता पंचांनी दिलेले पांढरे कापड त्याने जमिनीवर अंथरले. मग दोघांची ‘सुहाग रात’ साजरी झाली... भल्या पहाटेच दोघेही उठले. झोपडीबाहेरची पंच मंडळी जागीच होती. त्याने तो पांढरा कपडा बाहेर येऊन पंचांच्या हवाली केला, पंचांनी कापड उलटसुलट करून पाहिले आणि सगळ्यांच्या तोंडून आवाज आला, ‘माल खरा निघाला... माल खरा निघाला!’ पंचांचा आवाज ऐकल्यानंतर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता तिचे जीवन मार्गी लागणार होते, कारण ‘अग्निपरीक्षेत’ ती उत्तीर्ण ठरली होती. मात्र जर माल खोटा निघाला असता तर...?
इथे समाजातल्या प्रत्येक उपवर मुलीला कौमार्याची परीक्षा द्यावी लागते. जर ती परीक्षेत नापास झाली तर तिच्या आयुष्याची जी काही ससेहोलपट होते, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. इथली प्रत्येक उपवर मुलगी ही ‘सीता’ असते. या सीतेला अग्निपरीक्षेचे चटके देणारा समाज म्हणजे ‘राम’ असतो.
मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...