आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी किती दिवस?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेनमध्ये तिघी पोलिस खात्यातल्या बायका होत्या शेजारी. खूप दिवसांनी भेटल्या होत्या एकमेकीला. “मुलं कुठायत, गावीच आहेत का अजून,’ वगैरे विचारणा चालली होती. एक म्हणाली, “आणलं तीन वर्षांपूर्वी इकडे, आईवडील पण आलेत.’ तिचं पोस्टिंग कुठेतरी व्हायचं होतं आता, कुठे घेऊ, काय करू, म्हणत होती. दुसरी म्हणाली, “जवळचंच स्टेशन दे, घरचं सगळं करून नऊला ऑफिस गाठायचं, तीन-तीन मुलांचं तोपर्यंत आटपायला तर हवं.’ तीन-तीन मुलं? मी दचकलेच. ती दिसत तर होती जेमतेम तिशीची. “मोठ्या दोन मुली होत्या, मी तर नाहीच म्हणत होते. पण सासूला वारस हवा होता, मागेच लागली. मग मुलगा झाला. आता त्यांना म्हणावं वाटतं, या सांभाळायला, तर तयार नाहीत.’ त्यांच्या दुसऱ्या सहकाऱ्याची पण हीच कथा एेकली. मुलगी दहावीत आहे, नि आता मुलगा झालाय. आणि एकीने पण मुलासाठी चान्स घेतला तर तिचं मिसकॅरेज झालं.

त्यांनी मुलगाच होणार, याची खात्री करून घेतलेली होती, असंही त्यांच्या गप्पांमधून स्पष्ट झालं होतं.आपल्या पोलिस खात्यात काम करणाऱ्या या तिघींच्या या गप्पा ऐकून सुन्न झाले. आणखी किती दिवस बायांना असं सातत्याने दाखवून देण्यात येणार आहे, की मुलगा जन्माला घालणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे, हाच त्यांचा महत्त्वाचा उपयोग आहे? आणि किती दिवस त्या हे ऐकून घेणार आहेत? का या बायांना घरच्यांना ठामपणे सांगता नाही आलं, की बास झालं? नाही आम्ही काही करणार. की त्यांना स्वत:लासुद्धा हवाच होता मुलगा? गर्भलिंगनिदान हा गुन्हा आहे, मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणं चुकीचं आहे, या उघड बोलल्या जाणाऱ्या गोष्टीही ठाऊक नसल्यासारखं त्या वागत होत्या. मग स्त्रीचा तिच्या शरीरावर हक्क आहे, त्यासंबंधीचे सर्व निर्णय तिचे तिने घ्यायचे असतात, हे तत्त्व तर दूरची बात.कायद्याचे रक्षक म्हणतो त्यांचीच ही गत पाहून अवघड वाटलं एकदम सगळं...