आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About How Women Should Think Of Themselves Too

स्वतःचा विचार करायची हीच वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्यादोघी ट्रेनमधल्या मैत्रिणी. आठवड्यातून दोनतीनदा एका ठरावीक ट्रेनला भेटायच्या. जेमतेम अर्ध्या तासाच्या प्रवासातल्या त्यांच्या गप्पा, बर्‍याचदा काल काय झालं, दिवस कसा झाला, मुलांचं काय चाललंय, वगैरे विषयांवरच्या. परवा भेटल्या त्या दिवशी खूप पाऊस होता. आदल्या दिवशीही संध्याकाळी जोरदार पाऊस झाला होता. साहजिकच त्यांची गाडी पावसाकडे वळली. ती सांगू लागली,

‘काल स्टेशनपर्यंत पोहोचायला रिक्षाच मिळाली नाही पावसामुळे, पाण्यातून वीस मिनिटं चालत स्टेशनला यावं लागलं. चिंब भिजून गेले होते, ट्रेनमध्ये पंख्यांमुळे थंडीने कापरंच भरलं मला. बाजूच्या बायकांना लक्षात आल्यावर पंखा बंद केला. पण अंगावरचे कपडे ओलेच होते. ठाण्याला पोहोचल्यावर पाहते तो काय, रिक्षासाठी ही मोठी रांग. तासभराची तरी निश्चिंती होती. तेवढ्यात माझ्या एका मित्राचा फोन आला, तोही त्याच ट्रेनने आला होता. मला म्हणाला, रिक्षाला खूप वेळ लागेल, पाऊस आहे, मी बाइकवरून सोडतो तुला पटकन.’
‘अरे वा, बरंच झालं की.’

‘नाही गं, नाही गेले मी. मला कसं तरी वाटलं. कोणी तरी पाहिलं तर उगीच...’
रिक्षासाठी एक तास थांबून अत्यंत थकलीभागलेली, भिजलेली ती घरी पोहोचली तेव्हा नऊ वाजले होेते. पटकन अंग पुसून कोरडे कपडे घालून कुकर चढवला तिने गॅसवर. मग पोळ्या करायला घेतल्या. पाण्यात चालल्याने आणि अडीच तास ओले राहिल्याने पाय खूप दुखत होते. पण करणार काय?

का गेली नाही ती मित्रासोबत, एवढा विचार का केला तिने? घरी मुलगा वाट पाहतोय, स्वयंपाक करायचाय, आपण दमलोय, उशीर झालाय आणि बाइकवरून सोडणारा मित्रच आहे, नवर्‍याच्याही ओळखीचा. तरी ती का नाही गेली? समजा, कोणी पाहिलं असतं, तर काय झालं असतं? कदाचित कोणी तरी विचारलं असतं नंतर कधी तरी, काय गं, त्या दिवशी कोण आलं होतं सोडायला? याच्यापलीकडे काही झालं असतं का? का बायका इतका इतरांचा विचार करतात? खरं तर, स्वत:चा विचार थोडासाही का करत नाहीत? कितीही पाऊस असला तरी पायघोळ साडी नेसतात आणि पाण्यातून चालावं लागलं, की गुडघ्यापर्यंत वर उचलून चालतात. त्यापेक्षा सलवार कमीज किंवा थ्रीफोर्थ का नाही घालत? निव्वळ मी बाई साडीच नेसते किंवा आमच्याकडे चालत नाही म्हणून? इतकी का गैरसोय करून घेतो आपण?
प्रत्येकीने या छोट्याछोट्या गोष्टींचा विचार करायची वेळ आता आली आहे.
पटतंय तुम्हाला?
mrinmayee.r@dbcorp.in