आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Jaswandi – Hibiscus

जास्वंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिची मैत्रीण लोणारला जाऊन आल्यावर तिला सांगत होती की तिच्या गेस्टहाउसच्या बाहेर पांढ-या जास्वंदीची खूप झाडं होती. आणि कोणीसुद्धा त्या फुलांना हात लावत नव्हतं. माळ्याला विचारलं तर तो म्हणाला, तुम्हा शहरातल्या लोकांना फुलांचं कवतिक. इकडं कुणाला काही वाटत नाही बघा त्याचं. न्या तुम्हाला हवी तेवढी काढून. मग तिच्यात उत्साह संचारला आणि केसांसाठी तयार करायच्या औषधी तेलात घालण्यासाठी खूप सारी फुलं तिनं तोडून मुंबईला आणली. त्या दोघी खूप वेळ मग जास्वंदीविषयीच बोलत होत्या.
किती रंगांची असतात ना जास्वंदीची फुलं. पांढरी, गुलाबी, केशरी, पिवळी. लालच्याही किती छटा. शिवाय कातरी, मिरची, भरगच्च अशा जातीही अनेक. तरीही आपल्याकडे जास्वंदी म्हणजे गणपतीला आवडणारं (खरं तर लागणारं) लाल फूल, एवढीच त्याची ओळख. त्यामुळे ज्यांच्या घराला अंगण आहे, तिथे लाल जास्वंदीचं एक तरी झाड असतंच. असंच एक भरगच्च पाकळ्यांच्या जास्वंदीचं झाड तिनं पाहिलं होतं बीड जिल्ह्यात ती पाचसहा वर्षांपूर्वी काही कामासाठी गेली होती तेव्हा. एका लहानशा खेड्यातल्या घरातल्या अंगणात ते झाड नि त्याला लगडलेली खूप फुलं. न राहवून तिने त्याच्या दोन फांद्या मागून घेतल्या होत्या. ट्रेनच्या प्रवासातनं त्या सांभाळून मुंबईपर्यंत आणल्या नि घरच्या जरा मोठ्याशा कुंडीत त्या लावल्या. चक्क त्या रुजल्या आणि पहिलं फूल आल्यापास्नं एकही दिवस फुलाविना गेलेला नाही. गावात होतं तसं खूप मोठ्ठं नाही येत फूल, पण खूप छान दिसतं फुलल्यावर. एका कॅनेडियन पत्रकारासोबत केलेली ती बीडची ट्रिप त्या जास्वंदीमुळे तिच्या मनात सतत ताजी असते.
लालभडक जास्वंदीचं फूल कागदावर जसंच्या तसं उतरवायची कसोटी लागायची ती शाळेत असताना चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षांचा अभ्यास करताना. कोणी मैत्रीण त्याच्या पाकळ्यांचा सुडौल आकार, अगदी स्पष्ट रेखीव दिसणारे स्त्रीकेसर व पुंकेसर त्या चित्रात उतरवताना पाहायला मजा वाटायची तिला. इतकं देखणं फूल तिला त्या चित्रांमुळेच खरं तर आवडायला लागलं होतं.
तुमच्या जास्वंदीची पण अशी गोष्ट आहे का एखादी, सांगणार ना आम्हाला?