आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Joy Of Being With Children

हसरं भविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप तणावाची परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा निराश/कंटाळवाणं वाटत असेल तर करायचे काही उपाय परवा कोणीतरी तिला सांगत होतं. त्यातले दोन तिला खूपच आवडले. एक होता संत्र किंवा लिंबूवर्गातलं फळ खाणं हा. संत्र सोलतानाच जो काही मस्त वास येतो, अगदी ताजंतवानं करून टाकतो, याचा आपल्याला अनेकदा अनुभव आलेलाच असतो. पण त्याला विज्ञानाच्या नजरेतून आपण पाहिलेलं नसतं. दुसरा उपाय होता लहान मुलांशी खेळणं. (ही मुलं शक्यतो दुसर्‍याची/शेजारची असतील तर अधिक बरं, असा एक खोडकर विचार तिच्या डोक्यात आलाच.) नुकतंच हसू लागलेल्या, पालथं पडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या मुलासोबत 15 मिनिटं घालवली तरी किती मस्त वाटतं ना! आपण काहीही केलं, कसाही आवाज काढला तरी ते बाळ हसतं किंवा तोंडातून काहीतरी विचित्र आवाज काढून आपला आनंद व्यक्त करतं. मग आपला हातच हातात धरून ठेवतं, बोटं तोंडात घालायचा प्रयत्न करतं. पालथं पडतं, मग पोटावर जोर आला म्हणून रडू लागतं. कारण अजून त्याला पाठीवर वळता येत नसतं. हे सगळं आपल्यासमोर सुरू असताना आपल्या डोक्यात इतर कोणताही विचार येणं अशक्य असतं. बाळाच्या चेहर्‍यावर आनंद दिसणं हेच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. ते हसलं की आपल्या चेहर्‍यावर आपसूक हसू उमटतं. त्यासाठी काहीही निरर्थक बोलण्याची, आवाज काढण्याची, हातवारे करण्याची आपली तयारी असते. आणि या प्रयत्नात आपण बाकीचं सगळं विसरून जातो. थोड्या वेळाने बाळ झोपूनही जातं आणि आपण नव्या दमाने कामाला लागतो.
एखाद्या घरी कोणाचा मृत्यू झालेला असतो. तिथे असं एखादं मूल असेल तरी घरातला तणाव, निराशा, खेद, दु:ख कमी व्हायला खूप मदत होते. माणूस गेल्याचं दु:ख नाहीसं होत नाही; पण तो भूतकाळ आहे, समोरचं लहानगं हे भविष्य आहे, त्याच्याकडे आनंदाने आणि आशेने पाहणं साहजिक आणि आवश्यक आहे, हे सर्वांनाच कळत असतं.
संत्र्यांचा मोसम असतो. लहान बाळंही आपल्या घरात सतत असतील असं नाही, पण शेजारीपाजारी असतातच. त्यांच्यासोबत असा थोडासा वेळ घालवणार ना कधीतरी ?

mrinmayee.r@dainikbhaskargroup.com