आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन आणि पुस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांततेचे नोबेल मिळवणारी पाकिस्तानातील धडाडीची युवती मलाला युसूफझाई हिच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पुरेसा पुरावा नसल्याचे कारण देत तेथील न्यायालयाने मोकळे सोडल्याची बातमी गेल्या आठवड्यात आली आहे. मलाला मुलगी असून शाळेत जाते, या कारणास्तव तिच्यावर २०१२च्या आॅक्टोबरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी मलालाला तातडीने इंग्लंडला नेण्यात आले व ती यातून वाचली. तेव्हापासून ती इंग्लंडमध्ये राहते आहे व शिकते आहे. दोन वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघासमोर केलेल्या भाषणात तिने म्हटले होते, ‘दहशतवाद्यांना वाटले होते की, माझं आयुष्य बदलेल, मी घाबरून जाईन. परंतु, काहीच बदललं नाहीये. उलट माझी भीती, निराशा मिटून गेल्या आहेत व सामर्थ्य आणि धैर्याचा जन्म झाला आहे.’ याच भाषणात तिने म्हटले होते की, दहशतवादी पेन आणि पुस्तकांना सर्वात जास्त घाबरतात. या दहशतवाद्यांच्या मुलांनीही हातात पेन व पुस्तक घ्यावं, अशी इच्छा तिने व्यक्त केली होती. तिने कितीही म्हटलं तरी तिचं आयुष्य या हल्ल्याने बदलून गेलं, हे स्वीकारावंच लागेल. तिला तिची मायभूमी सोडून परदेशात राहावं लागतंय, ती पुन्हा कधी पाकिस्तानात पाऊलही ठेवू शकेल की नाही, ही शंका ती गेली तेव्हापासून होतीच. आता तिच्या कथित मारेकऱ्यांना निर्दोष सोडल्याने तर याची खात्रीच पटावी.
काय वाटलं असेल तिला ही बातमी वाचून?
काळजात लक्क हललं असेल का काही? थोडीशी तरी भीती वाटली असेल का तिला? आणि ही बातमी वाचून पाकिस्तानातच राहणाऱ्या, शिकणाऱ्या, शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना, त्यांच्या आईबापांना काय वाटलं असेल?
शिकण्याची इच्छा इतकी धोकादायक असू शकते? त्याचे इतके गंभीर, जीवघेणे परिणाम होऊ शकतात, हे वास्तव खरंतर किती भीतिदायक आहे. पण तरीही मुली शिकताहेत, पाकिस्तानातच नव्हे, तर दहशतवाद्यांचा जिथे प्रचंड जोर आहे तिथे सगळीकडे. आफ्रिकेत बोको हरमच्या तावडीतून सुटूनही मुली शिकतायत. हे किती आशादायक आहे ना?

mrinmayee.r@dbcorp.in