आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंपाक आणि पूर्वग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुकिंग क्लाससाठी या क्रमांकावर फोन करा, अशी एका झाडाला लटकवलेली पाटी वाचून त्याने फोन केला.
हॅलो...
हॅलो...
कुकिंग क्लाससाठीचा हा नंबर आहे ना?
हो, कुणाला करायचाय क्लास?
कुणाला म्हणजे? मला.
हा फक्त बायकांसाठी आहे क्लास, स्वयंपाक तर त्याच करतात ना नाहीतरी. तुम्हाला स्वयंपाक शिकायचा असेल तर तुम्ही केटरिंग कॉलेजला जा ना. आम्ही नाही शिकवत पुरुषांना.
तो वैतागलाच. कॅनडातून महिनाभरासाठी सुटीवर भारतात आला होता, तेव्हा त्याला वाटलं काहीतरी नवीन पदार्थ शिकूया. म्हणून त्याने फोन केला होता तर हे ऐकायला मिळालं. तो जो समोरून माणूस बोलत होता, त्याच्या बोलण्यातून दोन पूर्वग्रह स्पष्ट होतात. पहिला, स्वयंपाक फक्त बायकाच करतात. दुसरा, पुरुषांना स्वयंपाक करायचाच असेल तर तो व्यावसायिक पातळीवर करावा/शिकावा. अशा पुरुषांनी (काय एकेकाला नसते उद्योग सुचतात बाई!) तो व्यवसाय म्हणून निवडावा आणि त्यासाठी योग्य अशा केटरिंग कॉलेजात जाऊन नीट शिकून घ्यावं. उगी अशा हौशी बायकांच्या क्लासला येऊन लुडबुड करू नये.
आपल्या भवतालची परिस्थिती खरं तर किती बदलतेय नाही! कितीतरी पुरुष निव्वळ गरज म्हणून नव्हे तर आवड म्हणून स्वयंपाकघरात पाऊल ठेवतायत. अगदी पोळीभाकरी नाही जमली तरी वरणभाताचा कुकर, वरणाला फोडणी, बटाट्याच्या काच-या, खिचडी, डोसे, सँडविचेस असे साधे प्रकार मधुरिमाच्या अनेक वाचकमित्रांना नक्की जमत असतील. आणखी काही असेही असतील, ज्यांनी आवडीने आई/बायकोकडून इतर काहीसे कठीण आणि कौशल्य लागणारे पदार्थही आजमावले असतील. मग अशा कोणाला वाटलं की कुकिंग क्लासला जाऊन वेगळ्या चवीचे पदार्थ शिकावे, तर त्यात वावगं काय?
तरी बाई म्हणजे स्वयंपाक आलाच पाहिजे, एवढंच नव्हे तर आवडलाच पाहिजे, हा हट्ट असणा-यांबद्दल आपण अजून बोललोच नाहीओत. ते नंतर कधीतरी.
सध्या वाचकमित्रांनी आम्हाला एवढंच सांगा, की तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतो का, कुठे शिकलात, तुमची खासियत काय आहे, वगैरे. म्हणजे पुढच्या वेळी तुमच्या गावाला आल्यावर जेवायचं कुठे हा प्रश्नच पडणार नाही नं!