आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Queen, Divya Marathi

खुद ही तो हैं हम... किनारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तसं पाहायला गेलं तर ‘क्वीन’ म्हणजे ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलीची गोष्ट आहे. चित्रपट सुरू झाल्यानंतर 15-20 मिनिटांच्या आत कंगना राणावतने साकारलेल्या रानीचं लग्न तिचा नियोजित वर विजयने, लग्न परवावर आलं असताना, मोडल्याचं दिसतं. विजय तिच्या प्रेमात आहे, पण आता तो लंडनमध्ये राहतो आणि रानी तर राजोरीसारख्या दिल्लीतल्या मध्यमवर्गीय भागात राहणारी, मॉडर्न नसलेली. मग आपलं ‘स्टेटस मॅच’ नाही होत म्हणून तो लग्न मोडतो. ते ऐकून रानी कोसळते. पण बरीचशी सावरतेही. आता तिच्यासमोर एकच उद्दिष्ट असतं. हनिमून. तिच्या स्वप्नातल्या पॅरिसमध्ये. नाही तरी तिचं नि विजयचं तिकीट असतंच पॅरिसचं. आईवडीलही लग्न मोडल्याच्या धक्क्यातून ती सावरेल, या उद्देशाने तिला जाऊ देतात आणि सुरू होतो रानीचा प्रवास. आणि तिच्यासोबत आपलाही.

असं म्हणतात की, प्रवासात खरी मजा आहे, कुठे जायचंय ते फार महत्त्वाचं नाही. हे रानीच्या बाबतीत अगदी खरं ठरतं. ती निघालेली असते पॅरिसला. अ‍ॅमस्टरडॅमही तिच्या यादीत आहे; पण ती फक्त या सुंदर शहरांमध्ये पोहोचत नाही, तर ती पोहोचते स्वत:पाशी. तिचा पहिल्यांदाच एकटीने केलेला आंतरराष्ट्रीय प्रवास पटकन पूर्ण होतो; पण पॅरिसला पोचल्यावर तिला स्वत:चा शोध लागू लागतो हळूहळू.

तिच्या हॉटेलमध्ये नोकरी करणार्‍या विजयालक्ष्मीशी तिची गाठ पडते आणि तिला एका नव्या जगाची ओळख होऊ लागते. थोडा विश्वास वाटायला लागलेला असतो. हातात नकाशा घेऊन शहर फिरायला ती बाहेर पडते. पण, ‘आयफेल टॉवर पे तुम्हे खाना खिलाऊंगा,’ असं सांगणार्‍या विजयची तिला पावलोपावली आठवण येत राहते. पॅरिसमध्ये फिरताना जिथूनतिथून रानीला आयफेल टॉवर दिसत राहतो आणि एकटेपणामुळे अत्यंत निराश झालेली ती तडकाफडकी भारतात परत जायचं ठरवते. ट्रॅव्हल एजंटला तिकीट काढायला सांगून हॉटेलवर येते आणि विजयालक्ष्मीसोबत एका क्लबमध्ये जाते. तिकडे थोडेसे मद्यपान केल्यावर रानीला मोकळेपणाची जाणीव होते.

‘हंगामा हो गया’च्या तालावर तुफान नाचते, आणि नाचतानाचता तिच्या कडूशार आठवणी ताज्या होतात. एका लग्नात ती नाचली म्हणून विजयने तिला कसं फटकारलं असतं ते आठवून ती अधिक जोमाने नाचते. परत येतानाचा टॅक्सीतला या दोघींचा प्रवास भारतात तरुण मुलींवर असलेल्या बंधनांचा अर्क दाखवून देतो. ‘व्हाय फार्ट अँड वेस्ट इट व्हेन यू कॅन बर्प अँड टेस्ट इट,’ असं विजयालक्ष्मी तिला म्हणते तेव्हा रानी म्हणते, ‘हमारे यहाँ लडकियों को डकार देना भी अलाउड नहीं है, इतनी चीजें हैं जो लडकियों को अलाउड नहीं है.’ मग त्या दोघी मुद्दाम ढेकरा काढतात तेव्हा राग येतोच आपल्याला, पण त्यांचा नाही तर मुलींना ढेकर देण्यावरही बंधन घालणार्‍या आपल्या समाजाचा.

दुसर्‍या दिवसापर्यंत तिचा आत्मविश्वास बराच वाढलेला असतो आणि ती परतीचं तिकीट रद्द करायला सांगते. विजयालक्ष्मीसोबत मस्त भटकते, शॉपिंग करते आणि अ‍ॅमस्टरडॅमकडे रवाना होते. त्या शहरात होस्टेलमध्ये तिला तीन मुलांसोबत एका खोलीत राहावं लागतं. सुरुवातीचा संकोच, लाज, ही बंधनं गळून पडतात आणि त्या चौघांची मस्त गट्टी होते. कारण ते तिच्याकडे एक बाई म्हणून न पाहता, केवळ एक माणूस म्हणून पाहत असतात. रशियन, फे्रंच आणि जपानी अशा या तीन मुलांसोबत तिला तिच्यातली ती सापडू लागते. तेलाच्या साठ्यांवरून होणारी युद्ध थांबेपर्यंत मी मिळतील त्या जागेवर चित्र काढत राहणार, असं सांगणार्‍या ओलेक्झांडरला ती म्हणते, ‘मलाही काही तरी करायचंय.’ त्यावर तो सहजपणे म्हणतो, ‘मग, तुला कोण थांबवतंय?’ या वेळी ‘चक दे’मधलं कबीर खानचं ‘वो सत्तर मिनट’ आठवल्याशिवाय राहत नाही. ‘ज्याने ज्याने तुम्हाला हॉकी खेळण्यापासून थांबवलंय, त्या सर्वांना दाखवून द्या की तुम्ही काय करू शकता,’ हे स्फूर्तिदायक शब्द प्रत्येकालाच लागू पडतात, हॉकी असो वेगळं शिक्षण की चाकोरीबाहेरची नोकरी. कधी ना कधी इतरांचं बोलणं ऐकायचं थांबवून स्वत:चं ऐकून त्याबरहुकूम वागायची सुरुवात करावीच लागते ना प्रत्येकाला.

अ‍ॅमस्टरडॅममध्येच तिला भेटतो मार्सेलो हा अत्यंत देखणा इटालियन शेफ. तोही तिच्यातल्या वाढत्या आत्मविश्वासाला खतपाणी घालतो. जी रानी भारतात परत येते, तिला स्वत:बद्दल फारशा शंका उरलेल्या नसतात आणि आपण बरंच काही करू शकतो, यावर गाढ विश्वास बसलेला असतो. तुला कधीही गाडी चालवता येणार नाही, असं विजयने तुच्छतेने म्हटलेलं असतानाही अ‍ॅमस्टरडॅममध्ये सराईतपणे गाडी चालवून वेळ मारून नेलेली असते ना या नव्या रानीने.

‘क्वीन’ पाहिला त्याच सुमारास कल्की कोचलिन या अभिनेत्रीने महिला दिनाच्या निमित्ताने केलेल्या एकपात्री प्रयोगाविषयी वाचलं. यूट्यूबवर जाऊन 17 मिनिटांचा हा प्रयोग पाहिला आणि जाणवलं ते हेच, आजच्या भारतीय तरुणीवर प्रचंड बंधनं आहेत आणि ती त्याच्याविरुद्ध छोटंसं का होईना, बंड पुकारण्याच्या मार्गावर आहे. ती त्यांच्याविषयी बोलू लागली आहे.

रानी दिल्लीतल्या पंजाबी मध्यमवर्गात वाढलेली, कल्की तर पुदुचेरीत अत्यंत आधुनिक व मोकळ्या वातावरणात मोठी झालेली. (मधुरिमाच्या महिला दिनाच्या विशेषांकात अकोला, अमरावती आणि जळगावातल्या तरुणींनी लिहिलेल्या लेखांमध्येही हीच भावना स्पष्टपणे मांडण्यात आली होती, हेही तुम्हाला आठवतच असेल.) कल्की म्हणते, ‘श्श.., कंट्रोल. हळू बोल. बंद कर. सरळ बस. पाय असे ठेवू नकोस. कपडे नीट घाल. हा धर्म असं सांगतो, तो धर्म तसं. सतत कुणीतरी काही तरी आपल्याला सांगतच आलंय. आपण सगळ्या दमलोय, हे करून ते करून हे करून ते करून. माझ्याकडे बघ, मी स्त्री आहे ते विसरून. तुला दिसेल मी पण माणूस आहे. मी तुझ्यापेक्षा वेगळी नाहीये.’ हे आणि असं बरंच काही.

चित्रपटाच्या अखेरीस रानी तडफदारपणे आणि आनंदात चालत जाताना दिसते. कारण तिला खरी रानी सापडलीय. तिच्या आईवडिलांच्या भरवशामुळे, विजयालक्ष्मीमुळे, ओलेक्झांडर-टिम-ताकामुळे, मार्सेलोमुळे. आणि विजयमुळेसुद्धा.
म्हणूनच शेवटीशेवटी येणारं किनारे हे अन्विता दत्ताने लिहिलेलं गाणं पार हृदयाला भिडतं...
औरों से क्या, खुद से ही, पूछ लेंगे राहें
यहीं कहीं, मौजों में ही ढूँढ लेंगे हम किनारे...

mrinmayee.r@dainikbhaskar