आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Recipe Chain, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाककृतींची साखळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक ईमेल आलं तिला गेल्या आठवड्यात. कॅनडात राहणा-या अल्मास नावाच्या एका मैत्रिणीचं. पहिल्यांदा थोडं संशयास्पद वाटलं कारण ते साखळी ईमेल होतं. वाचल्यावर लक्षात आलं की ते थोडंसं वेगळं आहे. त्या ईमेलमध्ये दिलेल्या एका ईमेल पत्त्यावर एक सोपी, पटकन सुचेल ती पाककृती लिहून पाठवायची होती. आणि मूळ ईमेल 20 जणांना पाठवायचं होतं. तिने पटकन भाज्या घातलेल्या भाताची कृती लिहून पाठवली आणि ईमेल काही मैत्रिणींना पाठवलं. दुस-या दिवशी ही भाताची कृती जिला मिळाली होती, तिचं म्हणजे कॅथीचं, मेल आलं, थँक यू. तू कुठे राहतेस, काय करतेस, वगैरे. ती होती कॅनडियन. भारतात येऊन गेली होती एकदा. त्याचं वर्णन लिहून पाठवलंन. त्यानंतर आल्या तीन जणींकडून तीन वेगळ्या पाककृती.
रामाचे लाडू, उकरपिंडी आणि कोलंबीची झटपट भाजी. या तिघींना तिचा ईमेल पत्ता अर्थातच या साखळी ईमेलमधून मिळाला होता. आणि तिने जसा त्याला प्रतिसाद दिला तसा त्यांनी दिला. वंदना होती कोल्हापुरातली, रामाचे लाडू सांगणारी. तिने लिहिलंन, मी लहान असताना नुकतीच गॅसला हात लावायची परवानगी मिळाल्यावर शाळेतून आल्यावर लागलेली भूक आवरायला हे लाडू करायचे. वय वाढल्यावर विसरले होते, या निमित्ताने आठवण झाली त्यांची. तिने तर कोल्हापूरला यायचं आमंत्रणसुद्धा दिलंन. उकरपिंडीची कृती सांगणारी शैलजा, बहुधा विदर्भातली. कारण तिने कृतीच्या शेवटी लिहिलंय, हा विदर्भातला खास पदार्थ आहे म्हणून.
तंत्रज्ञानाने जग जवळ येतं, वगैरे आपण नेहमी ऐकत असतो. या साखळी ईमेलमुळे तेच तर झालं. कोण कुठल्या शैलजा, वंदना, कॅथी, अल्मास. निव्वळ या साखळीतला एक दुवा झाल्या. त्यातून त्यांना पाच मिनिटं विचार करायला लागला, काय पटकन जमेल करायला, त्यासाठी लागणारे पदार्थ सहज उपलब्ध असतील ना, वगैरे. शिवाय पदार्थ थोडासा वेगळाही
हवा होता. त्यांच्या या पाककृती खरंच सोप्या होत्या नि ती त्या नक्की करून पाहणार आहे.
तुम्हाला असं कोणी विचारलं, तर कशाची कृती सांगाल बरं?
mrinmayee.r@dainikbhaskargroup.com