आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Republic Day Parad

आरडी पेरडीच मोहिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२६ जानेवारी म्हटलं, की कॉलेजचे दिवस आठवतात. एनसीसी ऊर्फ राष्ट्रीय छात्र सेना आणि २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणारं संचलन या एकमेकांशी जुळलेल्या गोष्टी. एनसीसीतली मुलं या संचलनाला आरडी परेड म्हणतात. आणि त्यासाठी दिल्लीत महिनाभर राहतात, तो असतो आरडीसी म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प. आरडी परेड हा एनसीसीतल्या मुलामुलींसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा विषय. या संचलनात सहभागी होण्यासाठी ज्या छात्रांची निवड होते, ते कॉलेजात एकदम सेलिब्रिटी होऊन जातात. हे छात्र अष्टपैलू असावे लागतात, असं म्हटलं तरी चालेल. त्यांचं संचलन उत्कृष्ट असावंच लागतं. त्यांचा आवाज, वावर, शिस्त, नैतिकता या घटकांसोबतच त्यांना नृत्य/संगीत यांतही गती असावी लागते, किंवा योग/जिम्नॅस्टिक्स यांसारख्या प्रदर्शनीय प्रकारांमध्ये तरी. प्रत्येक कॉलेजमधून किंवा एनसीसीच्या विभागातून ठरावीक छात्र यासाठी निवडले जातात. एक जानेवारीपासून आरडीसी सुरू होतो व त्यात त्यांचे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे प्रशिक्षण सुरू होते. जवळपास एक महिना संपूर्ण देशातून आलेले १५ ते २० वर्षे या वयोगटातले हे युवक-युवती एकत्र राहतात. आरडीसी एका अर्थी मिनी भारत असतो. यंदा देशभरातून दोन हजारांहून अधिक छात्र दिल्लीतल्या आरडीसीत कसून सराव करताहेत. दिल्लीतल्या थंडीत पहाटेपासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि त्यांना अथक मेहनत करावी लागते. एवढ्या मोठ्या संख्येने छात्र एकत्र आल्यावर काही प्रमाणात गैरसोयही होतेच. परंतु, २६ जानेवारीचे संचलन हे त्यांचे लक्ष्य असते. त्यामुळे सर्व नकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करून ते मेहनत घेतात. एनसीसी छात्रांच्या तुकड्या राजपथावरून संचलन करतात, तेव्हा त्या विशेष लक्ष वेधून घेतात. एनसीसीत काही काळ घालवणा-या प्रत्येक छात्राच्या काही किमान शिस्त अंगवळणी पडलेली असते. एक महिना मिनी भारतात घालवल्यानंतर छात्र आपापल्या घरी परत येतात, ते दमलेभागलेले जरूर असतात, पण त्यांच्यात खूप बदल झालेला असतो. एक माणूस म्हणून ते खूप मोठे झालेले असतात. तुमच्या ओळखीचे/च्या आहेत का कोणी असे‌/अशा आरडी रिटर्नड छात्र?