आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Saras Mahalaxmi Exhibition.

बचत गटांचा ‘सरस’ आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणीटंचाई, दुष्काळ यांमुळे शेतीचं उत्पन्न जवळपास नाहीच. सगळं जनजीवन जणू थांबून गेल्यासारखं. अशा वेळी महिला बचत गटांचा मोठा आधार वाटतो. मुंबईत गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या सरस महालक्ष्मी प्रदर्शनाला दिलेल्या भेटीत अशा बचत गटांच्या प्रतिनिधींशी मारलेल्या गप्पांवर आधारित ही कव्हर स्टोरी.
हिवाळ्याची चाहूल लागली की, मुंबईकर सरस महालक्ष्मी प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात असतात. गावरान जेवण, मसाले, पापड, चटण्या, मांडे, हुरडा अशा सहसा मुंबईत न मिळणाऱ्या पदार्थांवर ताव मारायला ते आसुसलेले असतात. शिवाय घोंगडी, वेताच्या वस्तू, टेराकोटा, हातमागाच्या साड्या, पिशव्या, वेगवेगळे दागिने यांचीही वार्षिक खरेदी या प्रदर्शनात ठरलेली असते. इतकंच काय, गावरान आलं, कडधान्यं, तांदूळ, खवा यांनाही मोठी मागणी असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या महिला हे पदार्थ व वस्तू बनवत असतात, त्याचंही मोठं अप्रूप मुंबईकरांना असतं. अर्थात, या हसतमुख आणि कष्टाळू महिला घरी कोणत्या परिस्थितीचा सामना करत असतात, याची जाणीव फार लोकांना नसते, हेच खरं.

यंदाच्या सरसच्या उद‌्घाटनातच पंकजाताईंनी बचत गटांना मोफत कर्ज देण्याचं जाहीर केलं. त्यामुळे या महिला फारच आनंदात होत्या. अनेक जणींच्या घरी बचत गटाचं कर्ज परत करण्याइतकीही परिस्थिती दुष्काळामुळे नाहीये.
औरंगाबादजवळच्या फर्दापूरमधल्या संगीता गायकवाड यांचा या प्रदर्शनात स्टोन ज्युलरी आणि छोट्या मूर्तींचा स्टॉल आहे. बचत गटाचं कर्ज देण्यासाठी गटाचा तगादा होता, घरची शेती पाणी नसल्याने काहीच कामाची नाही. या वस्तू विकण्याचा त्यांचा अजिंठा लेण्यांजवळही छोटा स्टॉल आहे, परंतु तिथलं उत्पन्नही पुरेसं नाही. ‘म्हणून मी पंचायत समितीकडे अर्ज करून या प्रदर्शनात यायला मिळावं, असा प्रयत्न केला. इकडे बऱ्यापैकी विक्री होते, घर सावरायला मदत होते.’ असं त्यांनी सांगितलं. बारा-तेरा दिवस घर सोडून मुंबईत यायचं, मग घर कोण सांभाळतं, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, आहे सून पण ती नुकतंच लग्न करून आलीय, अजून सवय नाहीय संसाराची. त्यांच्यासोबत एक आजी आल्यात गावातल्याच, त्यांचीही सून घर सांभाळतेय. त्या काश्मीर, डेहराडून आदी ठिकाणीही प्रदर्शनांना जाऊन आल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा अंतरवली या गावातल्या जिजाबाई गावंडे यांच्या पतीचं चार महिन्यांपूर्वी निधन झालं. एक मुलगा आहे, अकरावीत, त्यालाही त्या मुंबईला घेऊन आल्या आहेत मदतीला. त्यांच्या स्टॉलवर भाकरी, भरीत, पिठलं, थालिपीठ, आमटी भात, पोळ्या असे पदार्थ मिळतात. त्यांच्या गावातनं दोन बचत गटांच्या मिळून सात जणी आल्या आहेत. अत्यंत चविष्ट जेवण, गरम ताजे पदार्थ आणि हसतमुख जिजाबाई यांच्यामुळे स्टॅलवर गर्दी असतेच. ‘माझ्या हातचं पिठलं एकदम टेष्टी असतंय. इथल्या सायबाला आवडलं होतं फार, त्याने माझा नंबर कोलकात्याच्या प्रदर्शनासाठी लावला होता ते चाखल्यानंतर. पण तेव्हाच लेकीची डिलिवरी होती, सीजर करावं लागणार होतं, नाही जाऊ शकले.’ त्या सांगतात. नवरा गेल्यावर घर चालवायला त्यांना त्यांच्या या पाककौशल्याचा चांगलाच फायदा होत आहे. जेवढी गुंतवणूक असते, त्याच्या दुप्पट तरी फायदा होतोच, असं त्या म्हणाल्या. पण कष्ट खूप असतात. पार पहाटेपासून तयारीला लागावं लागतं, ते रात्री उशिरापर्यंत उभ्याच असतात जिजाबाई आणि त्यांच्या सहकारी. शनिवार व रविवारी तर प्रदर्शनात खूप गर्दी होते, खवय्ये आवर्जून येतात जेवायला. महाराष्ट्राबाहेर जायचा धीर करायचाय आता, किती दिवस घाबरून राहणार, असं त्या म्हणतात, तेव्हा त्यांना आपसूकच शुभेच्छा दिल्या जातात.

बीडमधल्या ब्रह्मनाथ येळंब गावच्या असमा यांच्या स्टॉलवरही भाकरी-भरीत असाच मेनू आहे. त्यांची एमएससी करणारी मुलगी इंताझ त्यांच्या मदतीला आली आहे. गावी जमीन आहे, पण पाणी नाही, ही त्यांचीही कहाणी. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशसर, धामणगाव रेल्वे या गावातल्या कमल सुखदेवे यांना दोन वर्षांपूर्वी या प्रदर्शनात तिसरा क्रमांक मिळाला होता. त्यांची कणकेची लांब रोटी प्रसिद्ध आहे, ती सरसमधल्या इतर कोणत्याही स्टॅलवर उपलब्ध नसते. त्यांच्या स्टॉलवर मांसाहारी पदार्थही असल्याने त्यांची गुंतवणूक थोडी अधिक असते, परंतु फायदाही चांगला होतो.
सरससारखी अनेक प्रदर्शनं राज्यात व देशातही लागत असतात. सरसमध्ये महाराष्ट्राबाहेरच्याही बचत गटांचे स्टॉल आहेत. हिंदी वा मराठीचा गंधही नाही, तोडकंमोडकं इंग्रजी जाणणाऱ्या दाक्षिणात्य महिलाही इथे येऊन स्टॉल लावतात. उत्पादन चांगलं असेल, सुबक असेल तर माल लगेच संपतोही. एवढंच नाही, तर लोक फोन नंबर, वेबसाइट वगैरे विचारतात, पुढच्या वर्षी चौकशी करतात स्टॉल असणार आहे ना याची. अनेक बचत गट आता वेबसाइट सुरू करू लागलेत, जेणेकरून त्यांना वर्षभर विक्री करता येते.
या प्रदर्शनांमध्ये मिळणाऱ्या वस्तू मुंबई वा इतर मोठ्या शहरांमध्ये सहसा उपलब्ध नसतात. त्यामुळे त्या घ्यायला मुंबईकर अधिक उत्सुक असतात. चविष्ट जेवण तर कुणालाही केव्हाही कुठेही आवडतंच, त्याच्याकडे कोणी पाठ फिरवत नाही. त्यातून स्वयंपाक करणारी हसतमुखाने करत असेल, मोकळ्या हाताने वाढत असेल, आणखी काही हवं का याची चौकशी करत असेल तर चार घास जास्तच जातात, नाही का? शिवाय इथे बऱ्यापैकी स्वच्छता असते, हे महत्त्वाचं.
सरकार इथे स्टॉल लावणाऱ्या महिलांसाठी राहायची सोय करतं, दारिद्र्यरेषेखालच्या स्टॉलधारकांना जेवणासाठीही पैसे मिळतात, त्यांना स्टॅालचं भाडंही लागत नाही. उत्पादन उत्तम असेल तर फायदाही होतोच. आवश्यकता आहे ती हातपाय गाळून घरात बसून न राहता, कष्ट करण्याची, त्यांना योग्य मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने नेण्याची. आणि हेच काम बचत गट करत आले आहेत, हे अशा प्रदर्शनांमधून दिसून येतं.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....