आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भटकभवानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिचं आजोळ कोकणात. मुंबईहून त्या छोट्याशा खेड्यात जायचं म्हणजे तीसेक वर्षांपूर्वी एक प्रदीर्घ म्हणता येईल असा प्रवास असायचा. उपनगरातल्या घरून लोकलने मुंबई सेंट्रल. तिथून सामान घेऊन एसटी स्थानक. तिथे एसटीची वाट बघत ताटकळत बसायचं. एसटी आली की साधारण दहा तासांच्या प्रवासानंतर आंबलेल्या अंगाने रत्नागिरीला उतरायचं. तिथून दुस-या एसटीने बंदरावर जायचं नि तरीची वाट पाहायची. खाडी ओलांडायला असलेली छोटी नाव म्हणजे तर. काळ्या वाळूवर सामाना सोबत बसल्याच्या आठवणी किती ताज्या आहेत अजून. तरीतून पलीकडे जायचं. तिथून पावसपर्यंत एसटी.
तिथे मामाच्या घरचा गडी वाट पाहत असायचा. त्याच्यासोबत तीनचार किमी लांब असलेल्या गावात एक छोटासा डोंगर ‑ कोकणातल्या भाषेत घाटी - चढून गळून जायला झालेलं असायचं. पण मामाच्या घराची कौलं, शेजारी असलेलं देऊळ आणि दारातला लाल चाफा दिसला की अंगात चैतन्य यायचं. आता पंधरा दिवस तरी या लाल मातीच्या, हिरव्यागार परिसरात मनसोक्त राहायचं.

प्रवासाच्या या अगदी सुरुवातीच्या आठवणी. त्या काळात ट्रेनने लांब जाणं व्हायचं ते मनमाडला. पंचवटी एक्सप्रेसचा प्रवासही मजेचा असायचा. ट्रेनमध्ये बाबा कसे नेहमीपेक्षा वेगळे असायचे, त्यांनाही तो ब्रेक’ किती हवासा वाटायचा हे आजही आठवतं. गाडीत जे खायला मिळेल, स्टेशनवर जे विकायला येईल, ते बाबा घेणार म्हणजे घेणार. ब-याचदा गणपतीत मनमाडला जाणं व्हायचं. त्यामुळे गाडीतून बाहेरची हिरवंगार दृश्यं पाहायला मजा येई.
मग कधी गोव्याला जायचं तर कधी वाई. मोठं झाल्यावर तिने आणि भावाने मिळून आईबाबांना विमानाने बंगलोरला नेल्याची आठवणही भारीच. इतके खुश होते दोघं. त्यांच्या मध्यमवर्गीय घरात विमानप्रवास एरवीही कौतुकाचा विषय. मग हा पहिला तर अधिकच.
कामाच्या निमित्ताने खूप प्रवास केला तिने. बराचसा ट्रेनने.
भारतीय रेल्वेसारखी प्रवासाची मजा कशातच नाही, हे तिचं लाडकं पण ठाम मत. याच ट्रेनने तिने एकटीने खूप लांबलांबचा प्रवास केला. अनेक अपरिचित सहप्रवाशांशी कधी विसरू शकणार नाही, अशा गप्पा मारल्या. जेवण शेअर केलं. खिडकीत बसून बाहेरचा प्रदेश, घरं, माणसं पाहणं यासारखं दुसरं सुख नाही, यावर कुणाचंच दुमत नसावं. तर, उद्याच्या पर्यटन दिवसाच्या निमित्ताने तिच्यासारख्या सर्व भटकभवान्यांना, पायाला भिंगरी लावून कामासाठी किंवा नुसतं भटकायला म्हणून फिरणा-या सर्व मित्रमैत्रिणींना खूप शुभेच्छा.