आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Universal Printing Day

पांढऱ्यावर काळे करत जावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जागतिक मुद्रण दिन आहे. तब्बल साडेपाचशे वर्षं जुन्या छपाई कलेचा उत्सवच तो. युराेपातलं पहिलं पुस्तक छापलं गेलं ते २३ फेब्रुवारी १४५५ या दिवशी. योहान गुटेनबर्ग यांच्या जर्मनीतल्या मेंझ गावातल्या छापखान्यात मूव्हेबल मेटल टाइप वापरून ते छापलं होतं, ते होतं बायबल. (त्यापूर्वी किमान १०० वर्षं तर चीन/आशियात ही कला अवगत होती, असं इतिहास सांगतो. पण तेव्हा दळणवळणाचे मार्ग नसल्याने ती कला आशिया खंडाच्या बाहेर गेली नव्हती.) इतक्या वर्षांत छपाई कला कुठच्या कुठे पोहोचलीय, ते आपल्याला मुद्दाम विचार केला तर नक्की लक्षात येईल. जी मधुरिमा तुम्ही हातात धरून वाचताय, ती म्हणजे वर्तमानपत्र, पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी कसं होतं ते आठवतंय ना. फक्त पांढऱ्या कागदावर काळी अक्षरं, काळीच छायाचित्रं. फक्त पुस्तकांची मुखपृष्ठं रंगीत असत. नव्वदच्या दशकात वृत्तपत्रांचं पहिलं पान रंगीत झालं, हळूहळू आतली पानं रंगीत झाली. आता छोट्यात छोटं दैनिकही रंगीत निघतं. संगणकाने तर या कलेला चार चाँद लावले, असं म्हणावं लागेल.

छापणं शक्य झालं तसं मौखिक परंपरा मागे पडली, कारण प्रत्यक्ष सांगणारा समोर नसला तरी पुस्तकाच्या माध्यमातून त्याला काय सांगायचंय, ते दुसऱ्या व्यक्तीला कळू लागलं. एक पुस्तक अनेक व्यक्ती अनेक दिवसांपर्यंत वाचू लागल्या. एकाच पुस्तकाच्या अनेक प्रतीही काढता येऊ लागल्या. विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचं हे सहजसोपं माध्यम तयार झालं. आजही आपण फोन, टॅबलेट वा संगणकावर वाचत असलो तरी रोज सकाळचं वर्तमानपत्र तितक्याच उत्सुकतेने हातात धरतोच. ती उत्सुकता आहे म्हणून आम्हीही पांढऱ्यावर काळं करतोय नित्यनेमाने, जगभरातल्या घडामोडी आणि काही नवे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तसंच, तुम्हीही तुमच्या मनातलं आमच्यापर्यंत आणि इतर वाचक मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवताय याच छापील अक्षरांच्या माध्यमातून. जोवर आपल्याला ही नवं जाणून घेण्याची उत्सुकता आहे, तोवर पांढऱ्यावर काळं करत राहणारच आहेत लेखक व विचारवंत. त्यासाठी या गुटेनबर्गाची आठवण जागती ठेवायला हवी ना?

mrinmayee.r@dbcorp.in