रोज कोणीतरी नवीन मुलगा आमचा पाठलाग करायचा. ते खूप वाईटसाईट बोलायचे, आम्हाला त्यांचे फोन नंबर देऊ करायचे. रस्त्याने जाताना आजूबाजूचे लोक मात्र आमच्याचकडे अशा नजरेने पाहायचे, की जणू आम्हीच काहीतरी वावगं वागतोय.
आपल्या कॉलनीतले लोक कसे आहेत, तुम्हाला माहीतच आहे. ते असंच म्हणणार, की आम्हीच त्या मुलांना असं वागायला उत्तेजन दिलं असणार. मैंने कुछ गलत नहीं किया है, जिस की वजह से मेरे परिवार को शरमिंदा होना पडे. मैं मर रही हूँ क्योंकि मैं ये रोज रोज की टेन्शन नहीं ले सकती...
उत्तर प्रदेशातल्या रोहतकमधल्या १६-१७ वर्षांच्या दोन मुलींनी, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतल्या या काही ओळी. या दोघींनी ट्यूशन क्लासमध्ये मँगो ज्यूसमध्ये विष मिसळून ते पिऊन आयुष्य संपवलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार दोघींनाही अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याची इच्छा होती आणि त्या दृष्टीने त्या प्रयत्नही करत होत्या. परंतु रोज शाळेत व क्लासला जाताना होणाऱ्या छेडछाडीला व टवाळकीला कंटाळून त्यांनी चक्क आत्महत्या केली. एकीने तिच्या वडिलांना एका मुलाबद्दल सांगितले होते, परंतु त्यांना तो सापडला नाही.
चिठ्ठीतल्या ओळी वाचून काय लक्षात येतंय? त्यांची काहीही चूक नसताना, निव्वळ समाज काय म्हणेल या भीतीने त्या दोघींनी हे पाऊल उचलल्याचं सकृद्दर्शनी दिसतंय. काहीही झालं तरी करणारा जबाबदार नाही, तर जिच्यावर अत्याचार होतोय, जिला त्रास दिला जातोय, जिची छेड काढली जातेय तिच्याकडेच बोट दाखवण्याची आपली प्रवृत्ती या दोघींच्या जिवावरच उठल्याचं दिसतंय.
यावर उपाय काय? अपराधी वाटून घेणे ही स्त्रियांची जणू जन्मजात सवय आहे, तो सरसकट सर्व स्त्रियांच्या स्वभावाचा अतूट असा भाग आहे, असं वाटतं हे वाचून. पण ते तसं नसायला हवं. अपराधीपणाच्या भावनेला हद्दपार करायला हवंय आपण सगळ्यांनी. नोकरी केली तरी अपराधीपणा, घरी बसलं तरी. शिकलो तर जास्त शिकलो म्हणून अपराधीपणा, नाही शिकलो तर कमी शिकलो म्हणून. बोललो तरी अपराधीपणा, गप्प बसलो तरी. किती दविस असं वाटून घेणार आहोत आपण? आपलंही आयुष्य अत्यंत महत्त्वाचं आहे, आपल्यालाही जगण्याचा अधिकार आहे, आपल्याला आनंदी राहण्याचा अधिकार आहे, हे स्वत:लाच ठामपणे सांगायची वेळ केव्हाच आलेली आहे. दुसऱ्या कुणाच्या एखाद्या कृतीने वाईट
वाटणं वेगळं, परंतु त्यासाठी स्वत:लाच शिक्षा करून घेणं सर्वस्वी चुकीचं आहे. त्यावर काही
करता येत नसेल तर ठीक आहे, पण ती कृती मागे सरून जगत राहणं अधिक महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. हो ना?
mrinmayee.r@dbcorp.in
छायाचित्र : प्रतिकात्मक