आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असं प्रेम तसं प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅलेंटाइन दिनी जी जोडपी एकत्र फिरतील, हातात हात घेतील, त्यांचं लग्न लावून देण्यात येईल, असा दिलासा एका संघटनेने दिल्याने देशभरातील प्रेमी जीव सुखावले आहेत. १४ फेब्रुवारीच्या आठदहा दिवस आधीच या संघटनेने हे जाहीर केल्याने सर्व प्रेमी जीवांना तयारीलाही पुरेसा वेळ मिळाला आहे. संघटना लग्न लावून देणार म्हणजे घरचा विरोध तर एक झटक्यात मावळणारच, खेरीज लग्नाचा खर्चही येणार नाही. घरचा विरोध दूर करण्यात, समजूत घालण्यात जो वेळ वाया जातो, तो आता जाणार नाही. अनेक प्रेमी जीवांसाठी तर हा विरोध मावळण्याची शक्यताच दिसत नसते, मग ते बिचारे प्रेमालाच तिलांजली देतात. त्यांना हा किती मोठा दिलासा आहे ना? बरं, या संघटनेने जोडपं असा उल्लेख केला आहे. आता एक मुलगा व एक मुलगी यांनीच जोडपं होतं असं नाही ना, दोन मुलगे वा दोन मुली यांचंही जोडपंच
असतं की नाही? महत्त्वाचं आहे “जोड’पं. जोडी तर दोघांचीच असते ना. म्हणजे यात जे दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया एकमेकांसाेबत आयुष्य घालवू इच्छितात, त्यांच्या नात्याला विवाहबंधन घालू इच्छितात, त्यांचाही समावेश आहे, असं गृहीत धरायला हरकत नसावी.
एक मुलगा व एक मुलगी यांच्या प्रेमाला वेगवेगळ्या, लहानमोठ्या कारणांनी विरोध असतो. जात, धर्म, आर्थिक स्थिती, वय, असे कोणतेही मुद्दे या दोघांच्या विवाहाच्या आड येतात. (खरा मुद्दा हा असतो, की आम्हाला न विचारता प्रेमात पडलातच कसे तुम्ही दोघे एकमेकांच्या?) मग दोन मुलगे वा दोन मुलींच्या एकत्र येण्यात तर अडचणींचा डोंगरच असतो. अभिनेत्री/दिग्दर्शक चित्रा पालेकरांनी त्यांच्या मुलीला या परिस्थतीत समजून घेतलं, तिला पाठिंबा दिला, आधार दिला आणि या वेगळ्या माणसांच्या जगण्याला कसा अर्थ येईल, यासाठी आता त्या झटत आहेत. पण त्यांच्याबद्दल आपण वाचतच नाही, त्यांच्याबद्दल माहिती नकोच असते आपल्याला. नकोच तो विषय, असं म्हणून तो कपाटाखाली ढकलणं हीच आपली माणुसकी.
आपण आपल्या उंब-यापर्यंत गोष्टी येईपर्यंत तिची दखल घ्यायलाच तयार नसतो. ‘तिची मुलगी अशी आहे, असू दे, आपल्याला काय त्याचं?’, ‘त्याचा भाऊ ना तसा आहे, असू दे, मला काय त्याचं?’ असं होता होता, आपली मुलगी आपल्याला सांगते, ‘आई, मला माझी मैत्रीण खूप आवडते, मला तिच्यासोबत राहायचंय,’ तेव्हा आपल्या पायाखालची वाळूच सरकते. त्या क्षणापर्यंत आपल्याला ती काय म्हणतेय याचा संदर्भच नसतो, त्याचा अर्थ माहीत नसतो, तिचं भावविश्व ठाऊक नसतं. आपल्या तरुण मुलीच्या व मुलाच्या मनात काय चाललंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्यापैकी किती जण करतो? प्रेम हा यातला एक मुद्दा झाला, बाकीचेही नोकरी, घर, सामाजिक तणाव, आदी अनेक आहेतच. मुलाचं दुस-या व्यक्तीवरचं, साथीदार म्हणा वा जोडीदार, प्रेम आपल्याला मान्य नसतं. पण आपल्या आपल्या मुला/मुलीवरचं प्रेम तरी असतं ना खरं? जिव्हाळा, आपुलकी, माया, ममता, नाळ, रक्त वगैरे शब्द काय फक्त कथा कादंब-या आणि टीव्हीवरच्या मालिकांमधनं वाचायचे‌/ऐकायचे असतात? आपल्या मुला/मुलीला समजून घेणं, त्याचं मन उमगून जगण्याचं बळ देणं, आनंदात सहभागी होणं हेच खरं प्रेम असतं ना? प्रेमातला आनंद आपल्याला ठाऊक असतो, तसाच तो त्यांच्यासाठी असेल, असा हट्ट न ठेवता त्यांना आनंद वाटतोय, त्यात आपणही आनंदी होणं हे प्रेम नाही तर काय आहे? व्हॅलेंटाइनदिनी असं प्रेम करणारे आईबाबा होऊया ना आपण.