आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Women And Risk On Mumbai Streets

चला,थोडं भटकूया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई महिलांसाठी तसं सुरक्षित शहर मानलं जातं. तसं, म्हणजे देशातल्या व राज्यातल्याही इतर शहरांपेक्षा सुरक्षित. पण एखादं शहर सुरक्षित असतं, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असतो? ज्या शहरात महिला कोणत्याही वेळेला घराबाहेर पडू शकतात, फिरू शकतात, एकट्या प्रवास करू शकतात. आणि त्या प्रवास करतात तेव्हा त्यांना कोणी काही बोलत नाही, काही करत नाही. पण मुंबईत असं खरोखरच होतं की, तिथेही महिलांना घराबाहेर पडताना कारण द्यावं लागतं, सातच्या आत घरात किंवा तत्सम डेडलाइन पाळावी लागतेच? फक्त त्या बलात्कार किंवा लैंगिक हिंसेच्या बळी पडत नाहीत, एवढं एकमेव कारण सुरक्षित शहराची कसोटी पार करतं का? या हिंसाचारामुळे किंवा तो होईल या भीतीमुळे, सार्वजनिक ठिकाणी महिलांनी फिरण्यावर बंधनं येतातच. विशेषकरून जर त्या फिरण्याचा, चालण्याचा, नुसतं बसून समोरचा समुद्र पाहण्याचा, रस्त्यावरच्या टपरीवर चहा पिण्याचा, एकटीने गाडी चालवण्याचा, चित्रपट/नाटक पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडायच्या असतील तर ही बंधनं येतातच. हिंसेच्या या धोक्यामुळे त्यांनी घराबाहेरच पडू नये, कारण त्यांची इज्जत महत्त्वाची आहे, त्यांची इच्छा काय वाटेल ते असो, अशी मानसिकता आज मुंबईतही दिसते, इतर शहरांची गोष्ट सोडा.

याच मानसिकतेचा अभ्यास करून तीन वर्षांपूर्वी समीरा खान, शिल्पा फडके व शिल्पा रानडे यांनी ‘व्हाय लॉयटर? विमेन अँड रिस्क ऑन मुंबई स्ट्रीट्स’ हे पुस्तक लिहिलं. नुसतं पुस्तक लिहून त्या थांबल्या नाहीत तर या विषयावर जमेल त्या माध्यमातून आवाज उठवत राहिल्या, लिहीत राहिल्या. फेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सवरूनही त्या हे बोलत राहिल्या. त्यांच्या या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. दिल्लीतील बलात्कार घटनेला २०१४च्या १६ डिसेंबर रोजी दोन वर्षं झाल्याच्या निमित्ताने या तिघींनी ‘व्हायलॉयटर’ ही एक ऑनलाइन मोहीम सुरू केली. १६ डिसेंबर ते एक जानेवारी या काळात एकटीने अथवा इतर महिलांसोबत दिवसाच्या कोणत्याही प्रहरी, विशेषकरून सातच्या नंतर, बाहेर पडायचं आणि त्याचं छायाचित्र फेसबुक व ट्विटरवर शेअर करायचं. यामध्ये कामासाठी बाहेर पडणं अपेक्षित नव्हतं. कारण मुलांना शाळेत सोडायला, सामान आणायला, ऑफिसला जायला, बँकेत/पोस्टात कामं करायला, आजारी माणसांना भेटायला वगैरे महिला बाहेर पडतातच; पण नुसतं भटकायला, फिरायला, नाक्यावर/कट्ट्यावर जायला जशी घरातली मुलं‌/पुरुष बाहेर पडतात, तसं मुली/महिलांनी बाहेर पडावं, हे यात अध्याहृत होतं. ‘आई, जरा आलोच,’ असं घरातला मुलगा म्हणतो आणि सटकतो तो तासचे तास बाहेरच असतो, तो नक्की काय करतो, हे कुणालाच माहीत नसतं. पण कुठल्याही घरातली मुलगी असं म्हणाली की आई/आजी/वडील पटकन विचारणार, ‘कुठे चाललीस, कुणाबरोबर, कधी येशील, आत्ता जायलाच हवंय का?’ वगैरे. शाळा/कॉलेज/ऑफिस याव्यतिरिक्त मुलींनी एकटं घराबाहेर पडूच नये, हा बहुतांश घरांमधला अलिखित नियमच असतो, जो मुलांना लागू नसतो.

आणि हे मुलींना टोचत राहतं. त्यांना वाटतं, एकटीने चालायला जाणं, चित्रपट व नाटक पाहणं, गावात नशिबाने तलाव/समुद्र/नदी असेल तर त्या काठाने बसणं, इंग्रजी चित्रपटांमधनं पाहतो तसं कॉलेजच्या किंवा कॉलनीतल्या हिरवळीवर वाचत बसणं, वडापाव/पाणीपुरी खाणं, मस्त थंड हवेत टपरीवरचा चहा पिणं, मैत्रिणींसोबत कोपर्‍यावर गप्पा मारणं, मोठ्याने हसणं, यात चुकीचं काय आहे? घरातल्या जबाबदार्‍या, ऑफिसातलं काम, अभ्यास वगैरे टाळून हे करावं, असं यात अजिबातच अपेक्षित नाही. (पण मुलांनी/पुरुषांनीही ते टाळू नये, अशी अपेक्षा नक्कीच आहे!) पण कधी तरी अर्धा-पाऊण तास असा मनमोकळा काढला, तर त्याने मुलींना/महिलांना किती छान सकारात्मक वाटेल, याची कल्पना आपण नक्की करू शकतो. त्याएवढाच महत्त्वाचा मुद्दा हा की, सार्वजनिक ठिकाणी जितक्या जास्त महिला सतत दिसत राहतील, तितकी ती ठिकाणं सुरक्षित होतील. रात्री नऊनंतरही महिला रस्त्यावर असतील तर घरांमधनं ‘आत्ता या वेळेला एकटी कुठे निघालीस, आणखी कोणी नाहीये रस्त्यात, लोक काय म्हणतील’ असे संवाद कमी होतील. आपण एकट्या नाही, ही उबदार भावना यामुळे निर्माण होईल, असं या तीन लेखिकांना वाटतं.

सार्वजनिक ठिकाण म्हणजे जिथे सगळ्यांना सुरक्षित वाटते, कोणीही तिथे असण्याला/फिरण्याला आक्षेप घेऊ शकत नाही. रस्ते, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सी, बागा, चित्रपटगृहे ही सार्वजनिक आहेत, मग तिथे महिलांनी अमुकच वेळी असावे, अशी अपेक्षा का? रस्ते, लोकल, बस, बागा यांवर पुरेसा प्रकाश असला तरी तिथे अधिक सुरक्षित वाटतं, मग आपल्या वापराच्या सर्व रस्त्यांवर पुरेसे िदवे आहेत का, चालू आहेत का, याचाही विचार यात येतो. सुरक्षारक्षक असणं म्हणजे सुरक्षा आहे, असं नव्हे. तर स्वच्छ, खुल्या, भरपूर उजेडाच्या जागा महिलांना हव्या आहेत. यात सार्वजनिक स्वच्छतागृहेही आलीच.

या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी फेसबुकवरून लाॅयटर - भटकणे यासाठी वेगवेगळ्या भाषांमधले शब्द गोळा केले. मराठीत फेरफटका, फेरी मारणे, पाय मोकळे करणे, भटकंती, उंडारणे, भटकभवानी, उकिरडा फुंकणे, चक्कर मारणे असे शब्द मिळाले. मटरगश्ती, घूमना, टूरन जाँवा, आवारागर्दी, तफरीह, सैरसपाटा, रखडपट्टी असे काही शब्द हिंदी, उर्दू, पंजाबी, गुजरातीत सापडले. तामिळ, तेलुगु, काश्मिरी, सिंधी, कानडी अनेक भाषांमधून अनेक शब्द अनेकींनी शेअर केले. अनेक शब्दांमधून महिला आणि भटकणे किंवा भटकणार्‍या महिलांसाठी नकारात्मक छटा स्पष्ट जाणवते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धिमाध्यमांनीही या मोहिमेची दखल घेतली आहे. ‘महिलांसाठी असुरक्षित जागा’ अशी भारताची प्रतिमा बदलण्यात या मोहिमेचा मोठा हातभार असेल, हे नक्की. ही आॅनलाइन मोहीम सुरू झाल्यानंतर भारतातल्या अनेक छोट्यामोठ्या गावा/शहरांमधून मुली/महिलांनी त्यांचे भटकतानाचे फोटो टाकले. श्रीनगरच्या दाल सरोवराच्या काठावर बसून छोलेपुरी खाण्यापासून पुण्यातल्या बागेत मुलीसोबत फिरण्यापर्यंत, ऑस्ट्रेलियात एका समुद्रकिनारी बसून पुस्तक वाचण्यापासून कोलकात्यात फिरण्यापर्यंत, गुरगावमध्ये रिक्षात बसून भटकण्यापासून मैत्रिणींसोबत सिंहगडावर जाण्यापर्यंत अनेक फोटो यात आहेत. या मुली/महिला हे सगळं आधीही करत असतील कदाचित, परंतु आता हे फोटो पाहून त्यांच्या इतर मैत्रिणींना भटकावं वाटायला लागलंय, ते जास्त महत्त्वाचं.
तर मग, तुम्ही पण जाणार ना भटकायला लवकरच? पण विनाकारण हं!

मृण्मयी रानडे | मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in