आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article About Women Scientists Of ISRO, Divya Marathi

पृथ्वीच्या पल्याड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्याच प्रयत्नात आपलं मंगळयान मंगळाच्या कक्षेत जाऊन पोचलं मागच्या आठवड्यात. इस्रो - इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या शिरपेचातला हा आणखी एक मानाचा तुरा. शेकडो वैज्ञानिक आणि अभियंते या कामात अनेक वर्षांपासून लागलेले होते. त्यात अगदी दहाच टक्के का होईना, परंतु महिला वैज्ञानिक व अभियंताही होत्या. (कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स हे दोन अंतराळवीरांचे चेहरे आपल्या अगदी ओळखीचे, परंतु त्यांना अंतराळात पाठवणाऱ्या पथकाचंही महत्त्व तेवढंच असतं, पडद्यामागच्या कलाकारांसारखं.) त्या सगळ्यांनीच परदेशात, अगदी जगप्रसिद्ध नासा या संस्थेतही जाण्याचा विचार न करता, भारतातच राहून भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी होण्याचं ठरवलं, हे एक वैशिष्ट्य. दुसरं हे, की त्या स्वत:ला महिला वैज्ञानिक समजत नाहीत. कारण ‘आम्ही दिवसातले अठरा अठरा तास अत्यंत स्वच्छ अशा खोलीत विशिष्ट प्रकारचे कपडे घालूनच काम करत असतो, त्यामुळे कोण पुरुष आहे आणि कोण स्त्री, हेच कळत नाही!’
आतापर्यंत इस्रोचे सात अध्यक्ष झालेत, सर्वच्या सर्व पुरुष. सर्वसामान्य नागरिकांच्याही मनात इस्रोतील वैज्ञानिक वा अभियंते म्हणजे पांढरे कोट घातलेले पुरुष हीच प्रतिमा आहे. मात्र, त्याला गेल्या काही वर्षांत छेद दिलाय या महिलांनी. तीन वर्षांपूर्वी अवकाशात सोडलेल्या जीसॅट १२ या उपग्रहाच्या प्रकल्पाची प्रमुख जबाबदारी तीन महिलांनी सांभाळलेली होती. त्या होत्या प्रोजेक्ट डायरेक्टर टी.के. अनुराधा, मिशन डायरेक्टर प्रमोदा हेगडे आणि ऑपरेशन्स डायरेक्टर अनुराधा प्रकाशम. नंतर दोन वर्षांपूर्वी अवकाशात सोडलेल्या रडार इमेजिंग उपग्रहाच्या लाँचच्या प्रमुख होत्या एन. वलरमती. मंगळयानाच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या महिलांमधलं एक प्रमुख नाव आहे सिस्टिम्स इंजिनिअर मीनल संपत. सलग दोन वर्षं त्या या प्रकल्पावर काम करत आहेत. मंगलयान कधी मंगळ ग्रहाच्या कक्षेत सोडायचं, ती तारीख ठरलेली होती. त्यामुळे घड्याळात किती वाजलेत याकडे न पाहता मीनल आणि त्यांचे सुमारे ५०० सहकारी काम करत होते. गेल्या वर्षी पाच नोव्हेंबर रोजी हे यान अवकाशात सोडले गेले व ठरल्याप्रमाणे २४ सप्टेंबर रोजी त्याने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

‘मुलींनी याची किमान कल्पना तरी केली पाहिजे, की आपल्याला हे जमू शकतं. मी लहानपणी एका अवकाशयानाच्या लाँचचा कार्यक्रम पाहताना स्वप्न पाहिलं, की मला असं काहीतरी काम करायचंय. आता आमचं हे मंगळयानाचं काम पाहून मुलींना इथे येण्याची इच्छा होईल, त्याही असं स्वप्न पाहतील,’ अशी आशा मीनल यांनी याआधी दिलेल्या मुलाखतींमधून व्यक्त केली आहे. ‘तुम्ही स्वप्न पाहत राहिलं पाहिजे, आपल्याला काय करता येईल याचा सतत विचार केला पाहिजे. आपणच आपलं आयुष्य घडवू शकतो,’ असं त्यांचं सांगणं आहे. एन. वलरमती यांचं तसंच म्हणणं आहे, ‘सर्व महिला सगळं करायला सक्षम असतात आणि त्यांनी त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर केला पाहिजे.’
या वैज्ञानिकांची छायाचित्रं पाहून आमच्या युवा वाचक मैत्रिणींना एवढं तर वाटेलच ना, की मी एखाद्या स्पेस सेंटरची प्रमुख होऊनच दाखवेन!