‘युद्धस्य कथा रम्या’ अर्थात युद्धासंबंधीच्या गोष्टी रम्य, मनोरंजक असतात. महाभारत हे याचे मोठेच उदाहरण म्हणता येईल. विसाव्या शतकातील दोन महायुद्धांनी शेकडो कादंबऱ्या, कथा, चित्रपटांना जन्म दिला. भारत व पाकिस्तान/भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष व काल्पनिक युद्धांवरही अनेक चित्रपट आलेच. यापुढे अशा भारतीय कलाकृतींमध्ये नवीन नायिका येऊ शकते. लढाऊ वैमानिक असलेली, प्रत्यक्ष ‘फ्रंटवर’ जाऊन शत्रूच्या अत्यंत महत्त्वाच्या इमारतीचा वेध घेऊन हाताच्या बोटांचा व्ही करत
आपल्या ‘बेस’वर परत येणारी तडफदार तरुणी.
आठ ऑक्टोबर हा भारतीय हवाई दल दिवस. मागच्या आठवड्यात याच दिवसाचे औचित्य साधून हवाई दल प्रमुख अरूप राहा यांनी प्रत्यक्ष युद्धभूमी हे आजवर आवाक्याबाहेरचे क्षेत्र महिलांसाठी खुले करण्याचे जाहीर केले. यामुळे अनेक भारतीय तरुणींमध्ये एक नवे स्वप्न रुजले असेल, यात शंकाच नाही. प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन देेशासाठी कामगिरी बजावायची संधी आणि फायटर पायलट या शब्दांभोवती असलेले ग्लॅमर हे या स्वप्नांना खतपाणी घालणारे मुद्दे. त्यातच पाकिस्तानात दोन वर्षांपूर्वीच अशी संधी खुली झाल्याची ठुसठुस.
भारतात संरक्षण दलांमध्ये महिलांना प्रवेश मिळून फार वर्षे झालेली नाहीत. भूदल व नौदलातही महिलांना अजून लाँग कमिशन सहसा मिळत नाही. त्यातील अनेक महिला वैद्यकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व शैक्षणिक विभागांमध्ये काम करणाऱ्या आहेत. ज्याला युद्ध म्हणतात, त्यापासून महिला दूरच आहेत. परंतु, लढाऊ विमान चालवणे हे या सगळ्यापेक्षा खूपच वेगळे.
तिथे वैमानिकाच्या बुद्धिमत्तेची, क्षणात निर्णय घेण्याच्या क्षमतेची, डोळे, कान, गंध या संवेदनांच्या जाणिवांची, आणि प्रत्यक्ष विमान चालवण्याच्या तंत्रकौशल्याची कसोटी असते.
तीही आकाशात, जमिनीपासून काही हजार फुटांवर.
एकटे व फारतर दुकटे असताना.
शत्रूची विमाने आसपास घुटमळताना.
अस्त्रांचा मारा होत असताना.
या कसोट्या पार करून कामगिरी पार पाडून सुखरूप माघारी परत येण्याचे आव्हान या वैमानिकावर असते. ते महिलांना झेपवता येणार का, हा खरा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच गृहीत धरलेले होते. म्हणून इतकी वर्षे ही संधी महिलांना मिळाली नव्हती.आता चित्र बदलते आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इस्रायल, चीन वगैरे देशांमध्ये ते पूर्वीच बदलले आहे. विमानांच्या तंत्रज्ञानात, संवाद माध्यमांतही फार क्रांतिकारक सुधारणा झाल्या आहेत. महिला काही शारीरिक कसोट्यांमध्ये किंचित कमी असतात, जे नैसर्गिक आहे, ते वगळले तर त्यांना अशक्य काहीच नाही, हे जगभरातल्या अनेकींनी दाखवून दिलेच आहे.
परंतु, पुरुषांचा हात व डोळे यांच्यातला समन्वय महिलांपेक्षा चांगला असतो, त्यामुळेच अगदी गाडी चालवणे वा व्हीडिओ गेम्स खेळणे त्यांना महिलांपेक्षा चांगले व सहज जमते, असा समज आहे. या विषयावर अनेक संशोधनांमधून नेमके काहीच सिद्ध झालेले नाही. लढाऊ वैमानिकांचा विचार करताना एवढेच ध्यानात घ्यायला हवे की, आकाशात २००० किमी प्रतितास वेगाने जात असताना क्षणार्धात होणारी अत्यंत बारीकशी चूक जिवावर बेतू शकते. अर्थात तिथे त्या कमी पडणार नाहीत, पडू नयेत, यासाठी त्यांना अत्युच्च व कठीण, खडतर प्रशिक्षण दिले जाईलच.
तसेच आपला देश प्रत्यक्ष युद्धावर जाण्याची शक्यता किती, हेही तपासून घ्यायला हवे. कितीही सराव केला, प्रशिक्षण दिले, प्रॅक्टिस सॉर्टी कितीही मारल्या तरी शेवटी युद्ध ते युद्धच. आपण काही युद्धाचा थेट पुरस्कार करणाऱ्या देशांमध्ये नाही.
आणि काय आहे, आपल्या रस्त्यांवर आत्ता आत्ता कुठे मोटार चालवणाऱ्या महिला दिसू लागल्या आहेत. आत्ता आत्ता त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहणारे कमी झालेत. तरीही महिला मोटार चालवतेय, दुचाकी चालवतेय तर तिला मुद्दाम धक्का देणे, ओव्हरटेकचा प्रयत्न करणे हे सर्रास चालते. महिला चालक कशा तद्दन मूर्ख आहेत, त्या नियम पाळत नाहीत, त्यांना यंत्र व तंत्र काहीच कळत नाही, हा समज असणारे खूप आहेत. महिला वैमानिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही, आकाशात अजून तेवढा ‘ट्रॅफिक’ वाढलेला नाही. एवढेच.