आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आहे चॉइस?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय घेणार, गरम की थंड?
तू बाहेर येणार की नाही?
खायला काय करू? गोड की तिखट?
यंदा गोव्याला जायचं की काश्मीरला?

ही लाल साडी नेसू की ती हिरवी?
घराला रंग द्यायचा का यंदा? कुठला?
कोणत्या शाळेत घालायचं छकुलीला?
इंग्रजी की मराठी?
दहावीनंतर मी काय करू?
डॉक्टर होऊ की इंजिनिअर की पत्रकार?
लग्न करायचं की नाही?
कोणाशी करायचं ते कसं ठरवायचं?

याच्याशी चालेल, मग त्याच्याशी का नाही?
करायचं, तर कुठल्या पद्धतीने?
आज बाहेर जेवायचं का? कुठे? काय?
शंभरच रुपये आहेत हातात, काय काय आणता येईल बरं?

तांदूळ घेऊ की चहापत्ती की गूळ की डाळ की तेल?
चपला तुटल्यात, शिवून घ्याव्यात की नवीनच घेऊया?

ते ब्रेसलेट खूप मनात भरलंय, घ्यावं का अक्षय्य तृतीयेला?
की घर गळतंय ते दुरुस्त करावं त्या पैशांत?

छान नोकरीची ऑफर आहे, पण मुंबईला.
इथला संसार सोडून कसं जाणार?

परीक्षा पास झालेय डिपार्टमेंटच्या,
पण प्रमोशन मिळालं तर बदली नक्की.
मग नकोच घेऊ का प्रमोशन?
आत्ता खरं म्हणजे मूल नकोय मला,
जरा स्थिरस्थावर होतेय नोकरीत आणि संसारात.
काय करू? जाऊ का गायनॅककडे?
ती मुलगी मला खूप आवडतेय, आमचं प्रेम आहे एकमेकींवर,
पण आईला सांगू का? की सध्या तरी चुपकेचुपकेच बरं?

मस्त चहा पीत पुस्तक वाचावंसं वाटतंय,
ठेवून देऊन का कपडे, भांडी तसंच?
एक दिवस शाळेतल्या जुन्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा हाणायच्या आहेत.
ऑफिसचं काम आहे सांगून घरून घेऊ का बुट्टी?
की खरं सांगू घरच्यांना?

आहे का मला यात चॉइस?
की माझ्या प्रश्नांची उत्तरं दुसरंच कोणी देत आलंय नेहमीच?
बदलायचंय का मला हे?

मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in