आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचित धोके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्भयासारख्या बलात्काराच्या बातम्या गाजतात, अनेक काळ चर्चेत राहतात. परंतु परिचितांकडून होणाऱ्या अत्याचारांबाबत बहुतेकदा अळीमिळी गुपचिळीच असते. लहान मुलं वा महिलांवरील अत्याचार, हिंसाचार परिचित पुरुषांकडून अधिक होत असतो, या समाजशास्त्रीय मताला दुजोरा देणारी आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंद संस्थेने प्रसिद्ध केली आहे. अधिक म्हणजे नेमका किती, तर तब्बल ९९ टक्के! म्हणजे बलात्कार, लैंगिक अत्याचार, हिंसाचार, कार्यालयीन छळ आदि प्रकरणांमध्ये ९९ टक्के आरोपी पीडित महिलेच्या परिचयातले असतात. यात आजोबा, वडील, भाऊ आणि मुलगा, इतर नातलग, शेजारी, सहकारी, आजी/माजी नवरा/पार्टनर यांचा समावेश आहे. त्यानुसार, बहुतांश गुन्हे पीडित महिला किंवा आरोपीच्या घरात, कार्यालयात झालेले असतात. मुलींनी घराबाहेर पडू नये, नोकरी करू नये, शिकायला जाऊ नये अशी जबरदस्ती करणाऱ्यांचं यावर काय म्हणणं असतं विचारायला हवं ना? घरातच तिला जास्त धोका आहे, मग तिने जावं कुठं? की पृथ्वीतलावरून गायब व्हावं?

काय होतं नक्की ज्यामुळे एखाद्याला आपल्या पोटच्या मुलीवर, सख्ख्या बहिणीवर, जन्मदात्या आईवर, जिवाभावाच्या मैत्रिणीवर किंवा आपल्याइतकीच कुशल असलेल्या सहकारी महिलेवर बलात्कार करायची इच्छा होते? नुसतीच इच्छा नाही, तो प्रत्यक्ष कृतीही करायला धजावतो. समाजशास्त्राचा, मानसशास्त्राचा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभ्यास करणाऱ्यांचं स्पष्ट मत आहे की, बलात्कार हा लैंगिक भावनेतून आलेला नसतो. तिथे पुरुषाला फक्त सत्ता दाखवून द्यायची असते, तो (म्हणजे तो व्यक्तिश: नव्हे, तर एकंदरच पुरुषवर्ग) वरचढ आहे, हे सिद्ध करायचं असतं. म्हणूनच समोरच्या स्त्रीचं वय २ वर्षं आहे की, ७० याचा त्याला फरक पडत नाही. परिचितांकडूनच अत्याचार होत असल्याने पोलिसांपर्यंत जाणाऱ्या महिलांची संख्याही कमी आहे, कारण त्यांच्यावर कुटुंबाची प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल, याचा प्रचंड प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव येत असतो. फिरून फिरून आपण तिथेच पोचतो, मुलग्यांना मोठं करताना त्यांच्यावर काय संस्कार होतायत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हो ना?
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...