आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगांचा घोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज निज (म्हणजे अधिक नसलेल्या, येकदम ओरिजिनल) आषाढाचा पहिला दिवस. कालिदासाने शेकडो वर्षांपूर्वी म्हटलंय तसा पाऊस या आषाढात तरी पडू दे. काय आहे, ढगांचा पण घोळ झाला असणारेय ना खरा आषाढ कोणता नि अधिक आषाढ कोणता असा. अधिकात का पडा, हे भारतातले लोक काही तरी वेगळंच नाव देतील त्याला, त्यावरून काही तरी वेगळेच अर्थ काढतील, असं म्हणून हे मेघराज गपगुमान बसले होते बहुतेक महिनाभर. पावसाचं नाव नव्हतं राज्यात कुठेच. हवामान खात्याने वेगवेगळी कारणं दिली. अल निनो वगैरे वादळी प्रकार, अमुकतमुक दिशांनी वाहणारे वा अमुकतमुक दिशांनी न वाहणारे वारे, असे अद्भुत घटक या कोरड्या हवामानाला जबाबदार आहेत, असं सांगितलं. आपण सामान्य माणसं बाबावाक्यं प्रमाणम् असं म्हणून ऐकून घेतो आणि मनाचं समाधान करून घेतो की, हा अधिक महिनाच आहे नाही तरी, निज आषाढात नक्की पडेल पाऊस.
जूनमध्ये वेड्यासारखा कोसळल्यानंतर महिना सव्वा महिना अजिबातच पाठ फिरवणाऱ्या पावसामुळे सगळेच चिंतित आहेत. शेतकरी, शेतावर काम करणारे मजूर हे तर काळजीत आहेतच. पण शहरातली माणसंही वाट पाहताहेत पावसाची, नाही तर प्यायच्या पाण्याचे वांधे होणार आहेत आॅक्टोबरपासूनच अशी भीती वाटतेय. आधीच तीनतीन आठवड्यांनी पाणी येतंय अनेक शहरांमध्ये, माणसं किती प्रकारे पाणी वाचवताहेत, काळजीपूर्वक वापरताहेत. (आणि किती माणसं ते वायाही घालवताहेत. परवा पाणी आलं होतं आठवडाभराने औरंगाबादला, तर एक माणूस त्याची कार धूत होता चक्क त्या पाण्याने. अशा माणसांना ना भर चौकात...) असो, तर एकुणात काय, पाऊस हवाय. पण आमचा अंदाज असा की ढगांचा हा जो काही घोळ झालाय आषाढ कुठला त्याबद्दलचा, तो आज निस्तरला असेल, त्यामुळे आता तरी पडा बाबांनो, रिते व्हा, तर आम्हाला पेरते होता येईल.
पण एक शंका आहेच, त्यांना जर आज आषाढानंतरचा श्रावण सुरू होतोय असं वाटलं तर? तर काय नुसता ऊनपावसाचा खेळ पाहायला मिळणार की काय? काय आहे तुमचा अंदाज?
बातम्या आणखी आहेत...