आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकोशी अनिश्चितता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत गेल्या वर्षी गाजलेल्या बलात्काराच्या दोन प्रकरणांमधील आरोपींना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा झालीय. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील आरोपींनाही शिक्षा झाली. यानंतर या पीडित महिलांची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया पाहिली तर त्यात न्याय मिळाला, चुकीच्या वागण्याला शिक्षा मिळाली ही भावना सर्वात प्रबळ असते. अशीच भावना अपघाताच्या प्रकरणांमधील आरोपींना शिक्षा झाली की बळींच्या आप्तांकडून येते. अपघातात गेलेली व्यक्ती या शिक्षेमुळे परत येणार नसते, परंतु निदान ज्याच्या चुकीने एक जीव गेला, त्याला शिक्षा मिळाली, असं वाटतं. इंग्रजीत याला क्लोजर (closure) असा अत्यंत समर्पक शब्द आहे. मुख्यत्वे एखाद्या दु:खद वा दुर्दैवी घटनेनंतर, शेवट आल्याची, एक अध्याय संपल्याची भावना, असा काहीसा याचा अर्थ होतो.

परंतु हे क्लोजर मलेशियातील त्या गायब झालेल्या विमानातील प्रवाशांच्या व कर्मचार्‍यांच्या नातलगांना, मित्रमंडळींना कधी मिळेल का, असं वाटत राहातं. आपलं माणूस जिवंत आहे की नाही, हेदेखील माहीत नसणं यासारखं दुर्दैवी काही नसावं. ती अनिश्चितता जीवघेणी असते. त्यापेक्षा माणूस गेलाय असं नक्की एकदा सांगून टाका, असंही वाटतं आणि ज्याअर्थी अजून काही बातमी आली नाहीये त्याअर्थी ती

व्यक्ती जिवंत असल्याची आशाही आपल्या मनात जिवंत असते. अशा खेचाखेचीत अडकण्याची वेळ अनेकदा आपल्यावर येत असते. दरवेळी आवडत्या व्यक्तीचा मृत्यू हाच या खेचाखेचीच्या केंद्रस्थानी नसतो. अनिश्चितता कशाहीबाबत असू शकते.

घरातली एखादी व्यक्ती खूप आजारी असते आणि घरात एखादं कार्य असतं, तेव्हाही कार्य नीट पार पडेल ना अशी अनिश्चितता वाटतच असते सर्वांना. आजारी असलेली व्यक्ती बरी व्हावी, हीच इच्छा असते, पण मृत्यू काही कोणाला सांगून येत नसतो, त्यामुळे त्याचीही भीती वाटत असते. एवढंच कशाला, सुटीत भटकंतीला जायचं असतं, पण मुलांच्या परीक्षांच्या तारखा आलेल्या नसतात, त्यामुळे तिकिटं, हॉटेल काहीच बुक करता येत नाही. ऐनवेळेला काही होत नाही आणि सुटी घरातच घालवावी लागते. म्हणून ही अनिश्चितता नकोशी वाटते. कारण क्लोजर ही एका प्रकारे आवश्यक अशी सकारात्मक भावना आहे.

mrinmayee.r@dainikbhaskar