आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण पुस्तक वाचतो तेव्हा त्यातली पात्रं कशी असतील, दिसतील, बोलतील हे आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतं. चित्रपट पाहतो तेव्हा या पात्रांचं बाह्यरूप, आवाज आपल्यासमोर असतो. तरीही त्यांच्या कृतीमागचे विचार, डोक्यात काय चक्रं फिरत असतील, हे प्रश्न पडत असतातच पाहताना. त्यांची उत्तरं पुन्हा आपण आपल्या परीने शोधत असतो. अनेकदा ही पात्रं म्हणजे आपणच आहोत, आपलीच गोष्ट पडद्यावर दाखवतायत असं वाटत राहातं तर कधी आपल्या ओळखीतल्या कोणाची गोष्ट दिसत राहते. अगदी अनोळखी वाटणारी गोष्ट वा आपल्यापेक्षा अगदीच वेगळ्या असलेल्या पात्रांची गोष्ट सहसा आपल्याला आवडत नसते. आपण प्रत्यक्षात कसे वागतोय आणि पडद्यावरचं पात्र कसं वागतंय, याची तुलनाही अापण अनेकदा करतो. कधी त्यातनं धडाही घेतो कसं वागावं वा कसं वागू नये याचा. आता चित्रपट म्हणजे काही पाठ्यपुस्तक नव्हे, धडे वाचून शिकावं असं. पण अनेक चित्रपट असे अनेकदा पाहावेसे वाटतात आणि आपण त्यातनं दर वेळी काही तरी घेत असतो, उचलत असतो.

आजच्या या मधुरिमाच्या दिवाळी विशेषांकात अशा काही व्यक्तिरेखांबद्दल वाचायला मिळेल, ज्या आपल्या मनात घर करून बसल्या आहेत. ज्या आपल्याला अस्वस्थ करतात, ज्या आपल्याला आश्वस्तही करतात. अशा नायिका ज्यांच्यावर आपण प्रेम करू लागतो, ज्या आपल्याला आपल्यावरच प्रेम करायला लावतात. ज्यांच्यामुळे आपल्याला वाटतं, हेच ते, हेच मला हवंय, असंच व्हायचंय मला. अशा चित्रपटांबद्दल जे एकदा पाहून समाधान होत नाही. अशा गाण्यांबद्दल जी ऐकावी तितकी अधिक आवडू लागतात, आपल्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग होऊन बसतात.

या विशेषांकातल्या सर्व लेखिका २० ते ४० या वयोगटातल्या आहेत, हेही एक विशेषच. तरुण वाचकांना त्यांच्या आवडीनिवडीचा आरसा यात दिसेल, तर मध्यमवयीन वाचकांना कळेल आपल्या पुढच्या पिढीचे विचार काय आहेत, त्यांना काय हवंय. दिवाळीचा अानंद या विशेषांकामुळे द्विगुणित होईल, अशी खात्री वाटते. सर्व वाचक मित्रमैत्रिणींना मधुरिमा टीमतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...