आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल आणि मुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाइलला काही तरी झालं होतं दोनतीन दिवसांपासून, म्हणून ती मोबाइल दुरुस्तीच्या छोट्याशा टपरीवजा दुकानात गेली. तिथली मुलं तिच्या ओळखीची होती, विस्मयकारक जुगाड करून जवळपास कोणत्याही अवस्थेतला मोबाइल पुन्हा चालू करण्याची कला त्यांना अवगत होती. तिने फोन त्यांना दाखवला, दोन दिवसांत त्यांनी तो नाॅर्मल चालू करून दिला. काही दिवसांनी मुलीसाठी नवीन मोबाइल घ्यावा म्हणून ती जरा मोठ्या दुकानात गेली. तिथे अशीच जुगाडू चारपास मुलं, मराठी/तामीळ/गुजराती बोलणारी, काउंटर सांभाळत होती. त्यातलं कोणी फारसं शिकलेलंही वाटत नव्हतं. पण ज्या वस्तू ते विकत होते, त्याबद्दल मात्र त्यांना खडान् खडा माहिती होती. लेकीला आवडलेला आणि खिशाला परवडणारा एक मोबाइल घेऊन ती घरी परतली.

पण तिच्या डोक्यात काही तरी खटकत होतं. मोबाइलचा वापर स्त्रिया व पुरुष सारखाच करतात. स्त्रियांसाठी तो कदाचित उपयुक्त साधन असतो, तर पुरुषांसाठी बहुधा सतत नवनवीन माॅडेल येत असणारं एक गॅजेट. पण मग माेबाइलच्या दुकानात, दुरुस्तीच्या म्हणा वा विक्रीच्या, एकही तरुणी का काम करताना नाही दिसत? निदान तिने तरी पाहिलेली नाही. मोबाइल दुरुस्तीचे अभ्यासक्रम आयटीआयमध्ये करता येतात, दुरुस्तीचं काम घरूनही करता येतं. पुरुषांना दुकान टाकण्याजोगे पैसे उभे करता येतातच, ना मग बायांना का हे जमू नये? मोबाइल दुरुस्तीची दुकानं तर अगदीच छोटी असतात, चार बाय तीन फूट किंवा साधारण तेवढ्याच आकाराची. जागेला भांडवल लागेल तेवढंच, आणि विजेची जोडणी. तरीही कोणतीच मुलगी असा विचार का नाही करत बरे?
तिच्या ओळखीची एक मुलगी आहे, उच्चशिक्षित आणि बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर नोकरी करणारी. तिला मोबाइलमध्ये खूप रस, ती अगदी आत्ताआत्तापर्यंत करायची मोबाइल दुरुस्त फावल्या वेळात. अशा आणखीही मुली असतील ना, एक यंत्र वा उपकरण म्हणून मोबाइलमध्ये तांत्रिक रस असलेल्या. त्या का नाही करत हे काम?
आहे तुमच्या पाहण्यात कोणी मुलगी अशी, जी या व्यवसायात आहे? तिची गोष्ट ऐकायला आवडेल आम्हाला.

(mrinmayee.r@dbcorp.in)
बातम्या आणखी आहेत...