आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यरत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहा वर्षं पूर्ण करून सातव्या वर्षात पदार्पण करताना हा वर्षपूर्ती अंक तुमच्यासमोर आणताेय. दरवर्षीप्रमाणेच या अंक एका विशिष्ट संकल्पनेभोवती बांधलेला आहे. आणखी अडीच महिन्यांत, भारताला स्वातंत्र्य मिळाली त्याला ७० वर्षं पूर्ण होतील. हे निमित्त साधून स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी जन्माला आलेल्या अशा काही महिलांची ओळख आजच्या अंकातून करून देतोय, ज्यांच्या मनात वयाची सत्तरी ओलांडणं याचा अर्थ वार्धक्य, वानप्रस्थाश्रम वगैरे नाही. तर अाता जितकं आयुष्य मिळणार आहे अजून, ते पुरेपूर जगणं. आपल्याकडे जे आहे ते भरभरून देणं. आपल्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करणं. आपल्या क्षेत्रातील इतर व्यक्तींशी संपर्क ठेवणं, संवाद साधत राहाणं. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचा प्रयत्न करणं. हे सगळं करण्यासाठी आवश्यक आहे ते उत्तम, साथ देणारं शरीर. मग ते ठीकठाक चालत राहावं यासाठी व्यायाम करणं ओघाने आलंच. खूप काम करायचं असतं, त्यामुळे वेळेचं नियोजनही आवश्यक. या सगळ्या जणी ही काळजी घेतात, म्हणूनच त्या इतकी वर्षं काम करू शकल्या आहेत, आणखी कामं करायचं त्यांचं नियोजन पक्कं आहे. यातल्या काहीजणी देशातील स्त्रीवादी चळवळीच्या अध्वर्यू आहेत, किमान तीन ते चार दशकं त्या वेगवेगळ्या कामांच्या माध्यमांतून आपल्या समोर येत राहिल्या आहेत. त्या अजून थकलेल्या नाहीत, वाचनलिखाणभाषणसभा यांत व्यग्र आहेत. एक आहेत डाॅक्टर, ज्या आता वयामुळे हालचाली काहीशा मंदावल्या म्हणून शस्त्रक्रिया करत नाहीत, इतकंच. एक आहेत शास्त्रीय गायिका, ज्या पंचाहत्तरीतही परदेशात सादर करायच्या कार्यक्रमाच्या तयारीत सध्या गुंतलेल्या आहेत. दोघीजणी आहेत शिक्षणतज्ज्ञ. त्याही काही दशकांपासून शाळांशी जोडलेल्या आहेत, व अजूनही दिवसाचे २४ तास विद्यार्थीच त्यांच्या जीवनाचे केंद्रबिंदू आहेत. या सगळ्या जणींमुळे आपलं आयुष्य किती समृद्ध झालंय, समाजाच्या एकंदर प्रगतीत, संवेदनशील जाणिवा विकसित होण्यात त्यांचा किती मोठा वाटा आहे, ही जाणीव आम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घेताना झाली. तुम्हालाही त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि भविष्यासाठीची स्वप्नं यांबद्दल वाचायला आवडेल, अशी खात्री वाटते. अामचा आतापर्यंतचा सहा वर्षांचा प्रवास तुमचाच हात धरून सोपा आणि आनंददायी झालाय. त्याबद्दल मधुरिमा टीमच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते.
 
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...