आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाळाटाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पदोन्नती हवीय पण बदली नकोय. पगारवाढ हवीय पण वाढीव जबाबदारी नकोय. असे कोणी कर्मचारी, महिला वा पुरुष, ठाऊक असतीलच तुम्हाला. या सवलती महिलांना पुरुषांपेक्षा जास्त हव्या असतात, त्यामागची कारणं आपल्याला माहीत आहेतच.
 
प्रमुख कारण आहे कौटुंबीक जबाबदाऱ्या. या जबाबदाऱ्या बहुतांश घरांमध्ये संपूर्णपणे स्त्रियांनीच सांभाळायला हव्यात, अशी अपेक्षा असते. काही पैसे कमावणंही आवश्यक असतं, त्यामुळे नोकरी करावीच लागते. आणि या दोन्हीकडच्या जबाबदाऱ्या पेलणं अनेक कारणांनी कठीण होतं, म्हणून त्या सवलती मागतात. क्वचितप्रसंगी पुरुषांवरही अशा जबाबदाऱ्या असू शकतात, याची जाणीव आहे.
 
पण, कोणतंही कारण नसताना सवलती मागणाऱ्यांचं काय? निवडणुकीची ड्यूटी लागली की ती रद्द करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खरोखरच किती जणांना ती करणं शक्य नसतं? (यातही स्त्रिया आणि पुरुष दोन्ही आले.) की टळली तर बरं, असा विचार करणारेच जास्त? लोकशाही आहे, निवडणुका घ्याव्याच लागणार, त्यासाठी माणसं लागणार. मग कोणाला तरी ती जबाबदारी घ्यावीच लागणार, असा विचार करून पडेल ते काम आनंदाने का नाही करू शकत आपण? ड्यूटी लागली तर जो काही त्रास होतो, (त्रास होतो हे मान्यच आहे) पण तो सुसह्य व्हावा यासाठी आपण काय करतो, काही सूचना करतो का, आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागून त्यांची ड्यूटीही सुसह्य करतो का? की मला त्रास होतोय तर तो सगळ्यांना व्हायला पाहिजे, अशी आपली भूमिका नसते?
 
बँक वा पालिका कर्मचाऱ्यांचं उदाहरण घेऊ. विभागीय परीक्षा द्यायच्या. उत्तीर्ण झालं की, बदलीचा आदेश येतो. मग ती बदली रद्द करून घेण्यासाठी आकाशपाताळ एक करायचं. या सगळ्यात आपण जिथे जाणं अपेक्षित असतं, तिथे दुसऱ्या कोणाला जावंच लागणार, त्या व्यक्तीच्या परिस्थितीची मात्र दखल आपण घेत नसतो. हीच बदली परदेशात झाली तर मात्र आपण एका पायावर जायला तयार असतो. आपण काम करतो, त्याचा पगार मिळतो, ही देवाणघेवाण आहे, आपण काम करतो ते काही उपकार नसतात कोणावर, ही जाणीव जागृत व्हायची तीव्र गरज आहे. नोकऱ्यांची संख्या कमी आणि उमेदवार प्रचंड जास्त अशा परिस्थितीत तर ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत, त्यांनी जबाबदारी नीट पार पाडायला हवी, हे पटतंय ना तुम्हाला?
 
mrinmayee.r@dbcorp.in
 
बातम्या आणखी आहेत...