आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्‍लॅस्टिकला पर्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार लवकरच प्लॅस्टिकवर बंदी घालणार आहे. तशी प्लॅस्टिकच्या अगदी पातळ पिशव्यांवर बंदी आहेच. परंतु या बंदीकडे बहुतांश भारतीयांनी त्यांच्या अंगभूत गुणांमुळे दुर्लक्ष केलेलं आहे. आता नव्याने ही बंदी येतेय, तिचा आपण मान राखू, अशी आशा.


प्लॅस्टिकचा वापर गेल्या वीसेक वर्षांत प्रचंड वाढलाय, हे लक्षात आलंय का तुमच्या? आपल्या स्वयंपाकघरात पाहिलंत तर हे अगदीच स्पष्टपणे कळेल. मुख्य म्हणजे डबे. पितळेच्या डब्यांची जागा स्टीलच्या डब्यांनी घेऊनही जमाना झाला, पण या स्टीलच्या डब्यांऐवजीही आता आपण प्लॅस्टिक वापरू लागलोय. पदार्थ साठवण्यासाठी आणि शाळा वा आॅफिसात घेऊन जाण्यासाठीही. हा बदल आपण सोय आणि रंगीबेरंगी रूप यांमुळे केला, त्यात किंचित आधुनिकतेचंही आकर्षण होतं. हे प्लॅस्टिकचे डबे अर्थातच स्टीलच्या डब्यांएवढे टिकत नाहीत, ते फेकूनच द्यावे लागतात. गेल्या एकदोन वर्षांत अगदी तुरळक ठिकाणी फेकून दिलेलं प्लॅस्टिक गोळा करून त्यापासून इंधन तयार करणं, वगैरे उद्योग सुरू झाले असले तरी कुठेही फिरताना, प्रवास करताना, रंगबिरंगी प्लॅस्टिकचे ढीग डोळ्यांना खुपतात. लहानमोठी गावं, खेडी, शहरं काहीच याला अपवाद नाहीत. दुकानदार वस्तू बांधताना पूर्वी कागदाच्या पिशवीत देत, आता असे दुकानदार औषधालाही सापडणार नाहीत कदाचित. तेल पूर्वी दुकानावर जाऊन घरातल्या स्टीलच्या वा क्वचित काचेच्या बरणीत भरून आणलं जाई. आता तेही प्लॅस्टिकच्या पिशवीत वा बाटलीत येतं. तीच गोष्ट दुधाची. काचेच्या बाटल्या आताच्या मुलांना माहीतच नसतील. रोज जवळ एक कापडी पिशवी ठेवणं, जेणेकरून संध्याकाळी भाजी किंवा इतर काही विकत घेतलं तर त्यासाठी पिशवी लागणार नाही, ही सवयही पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींपर्यंतच राहिली आहे. 


आपणच ही वेळ ओढवून घेतलीय. सरकार फक्त कायदा करेल, नियम करेल. बदलायचंय आपल्यालाच. यात मुलांना सहभागी करून घेतलं तर त्याचा फायदा जास्त होणारेय. त्यांच्यासाठी आपण काय सोडून जाणार आहोत, हे आपण ठरवतोय. हे लक्षात ठेवायलाच हवंय.


काय बदल कराल आपल्या जीवनशैलीत, ज्यामुळे प्लॅस्टिकचा वापरच कमी होईल?
आम्हाला कळवा नक्की.


-मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...