आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौजेची हौजी शब्द हौशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेनाली  गुजर - Divya Marathi
साेनाली गुजर
मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबातले भाषेचे, शब्दांचे वेगवेगळे प्रयोग करणारे वडील. मराठीची प्राध्यापक असलेली कन्या. या दोघांच्या प्रयत्नांना कोंदण चढवणारी राज्य मराठी विकास संस्था. यातून साकारलेला एक जबरदस्त खेळ. त्याचं नाव शब्द-हौशी.
 
हाउजी वा हौजी हा तसा प्रसिद्ध आणि लोकप्रिय खेळ. नऊ आकडे छापलेली तिकिटं, आकडे खोडण्यासाठी एक पेन आणि फासे इतकं साहित्य पुरेसं असलेला हा खेळ सहली, कौटुंबिक समारंभ, कार्यालयीन कार्यक्रम असा कुठेही खेळता येणारा. मुंबईतले विजय देशपांडे यांना अनेक वर्षांपासून असं वाटत होतं की, हा खेळ मराठी शब्द वा अक्षरं घेऊन खेळता यायला हवा. देशपांडे यांचं मराठी भाषेवर अतोनात प्रेम आणि त्यांचा स्वभावही प्रयोगशील. ‘आयुष्यभर त्यांनी एअर इंडियात नोकरी केली, पण मराठीबद्दलची आपुलकी जपून ठेवली. मराठी हाउजी तयार करण्याचा त्यांनी चंग बांधला. त्यासाठी शेकडो कोडी पाहिली, ओळखीचे, अनोळखी शब्द शोधले,’ त्यांची कन्या सोनाली गुजर सांगतात. 
 
पारंपरिक हौजीत एका तिकिटावर नऊ आकडे असतात, त्यानुसार देशपांडे यांनी एका तिकिटावर चार अक्षरांचा एक व पाच अक्षरांचा एक असे नऊ अक्षरांचे दोन शब्द घ्यायचं ठरवलं. पाच अक्षरांचे शब्द मराठीत फार नाहीत, तसंच ते एकापेक्षा जास्त तिकिटांवर यायला नकोत. त्यामुळे जवळपास तीन वर्षं देशपांडे या शब्दांच्या हौजीच्या मागे लागले होते. सोनाली गुजर मराठीची प्राध्यापक. त्यामुळे तिच्याशी याबाबत कायम चर्चा होत.
 
देशपांडे यांनी तयार केलेल्या या खेळाचे त्यांनी त्यांच्या घरगुती समारंभांमध्ये, सहलींमध्ये प्रयोग केले, लोकांना तो अतिशय आवडलाही. मग त्यांना वाटलं, नुसता खेळ नको, याचे आणखी काय उपयोग होऊ शकतात, याचाही ते विचार करू लागले. राज्य मराठी विकास संस्थेशी याबद्दल बोलणंही झालं होतं, मात्र त्यातनं निश्चित काही आकार येत नव्हता. देशपांडे यांचं २०१७च्या जानेवारीत निधन झालं. त्या सुमारास राज्य सरकारच्या पुस्तकांच्या गावाची संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली होती. मग सोनाली गुजर आणि राज्य मराठी विकास संस्थेचे डाॅ. आनंद काटीकर यांनी या गावात हा खेळ ठेवण्याचं ठरवलं आणि आताच्या मराठी शब्द-हौशी या स्वरूपात हा खेळ जन्माला आला.
 
नुसताच शब्दांचा खेळ नको, त्यातनं आणखी काही मिळायला हवं, म्हणून या खेळात फाशांऐवजी जे पत्ते वापरले जातात, त्यात प्रयोग करायचं ठरवलं. यात ५४ पत्ते आहेत, प्रत्येक पत्त्यावर मराठीतील एका दिवंगत ज्येष्ठ साहित्यिकाचं छायाचित्र आहे, त्याच्या जन्म व मृत्यू दिनांकासहित. मागच्या बाजूला त्या साहित्यिकाच्या पुस्तकांची  नावं आहेत. व एक मुळाक्षर आहे. एकूण १९२ तिकिटं आहेत, म्हणजेच ३८४ शब्द आहेत, चार वा पाच अक्षरांचे. 
 
खेळ खेळताना जो पत्ता निघेल त्यावरचं छायाचित्र सर्वांना दाखवायचं, ते कोणी ओळखतं का ते पाहता येतं. मग मागच्या बाजूची त्याची माहिती वाचून दाखवायची. मग त्यावरचं अक्षर वाचायचं व आपल्या तिकिटावर ते अक्षर आहे का, ते ताडून पाहायचं.
 
यातनं खेळ होतोच, पण मराठी साहित्याविषयीही थोडी माहिती खेळणाऱ्यांच्या कानावर पडते. खेरीज शाळांमध्ये खेळताना वगैरे शिक्षक याचा आणखी अनेक पद्धतींनी उपयोग करून घेऊ शकतात. सोनाली गुजर यांनी सांगितलं की, पुण्यातल्या एका शाळेत त्यांनी हा खेळ खेळला तेव्हा अमुक अक्षर, त्यावरनं तयार होणारे शब्द, त्या शब्दांचा वापर करून तयार होणारं वाक्य असं बरंच काही मुलांकडनं करून घेतलं होतं.
 
पुस्तकांच्या गावाचं उद‌्घाटन होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. या दरम्यान हजारो लोकांनी गावाला भेट दिली आहे. अनेकांनी पुस्तकं तिथे बसून वाचलीही आहेत. अनेकांची मागणी आहे की, पुस्तकं गावात विक्रीलाही ठेवायला हवीत. या गावाला भेट दिली तेव्हा या मस्त खेळाशी ओळख झाली. मराठीच्या नावाने नुसते गळे काढण्यापेक्षा अशी सकारात्मक व नावीन्यपूर्ण निर्मिती करण्याच्या प्रयत्नांना दाद देणं महत्त्वाचं वाटतं. आणि, हा खेळ खेळण्यासाठी वयाचं बंधन नाहीच. नाहीतरी एक ते १०० आकडे अगदी बाळबोध असूनही आपण सगळे हाउजी आनंदाने खेळतोच ना? या खेळाच्या निमित्ताने काही जणांना मराठी साहित्यिकांची ओळख होईल, तर काही जणांची उजळणी नक्कीच होईल.
 
mrinmayee.r@dbcorp.in 
बातम्या आणखी आहेत...