आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंदगी के बाद भी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचा दिवस जरा खास असतो अनेक कुटुंबांसाठी. सर्वपित्री अमावास्येच्या निमित्ताने पितरांना जेवू घालण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आज पाळली जाते. हे लिहिताना समोर जीवन विमा प्राधिकरणाची जाहिरात आहे, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. या दोहोंची सांगड घातली गेली नकळत आणि वाटलं, आपल्याला जिवंत माणसांपेक्षा मेलेल्या माणसांची किंमत जास्त वाटते. जिवंत माणसाशी नीट वागायचं, व्यवस्थित जेवूखावू घालायचं, त्यांची काळजी घ्यायची सोडून ती मेली की, त्यांचे दिवस, श्राद्ध, पिंड, वगैरे अगदी बैजवार करायचं, असं वागणंच आजूबाजूला जास्त दिसतं. उदाहरणच द्यायचं तर, एखादी व्यक्ती आजारी आहे, रुग्णालयात आहे असं कळलं तर फार कमी लोक त्या परिस्थितीचा घरच्यांवरचा भार हलका कसा हाेईल, याचा विचार करतात. अशा वेळी रुग्णाच्या जवळ बसायचं आहे का, डबा पोचवायचाय का, घरी स्वयंपाकाला मदत हवीय का, लहान मुलं असतील तर त्यांची काही कामं करायचीत का, अशी अनेक प्रकारची मदत करता येते. परंतु, अनेक जण रुग्णाला भेटायला जाण्यातच धन्यता मानतात. रुग्णालयात जाण्याचे नियम धाब्यावर बसवून ते जातात. तोंड दाखवायला हवं, लोक काय म्हणतील, अशी भावना असते मनात फक्त. (रुग्णाला भेटायला गेल्यानंतर अशा लोकांचं बोलणं हा आणखीच वेगळा विषय.)

हेच लोक माणूस मरण पावल्यानंतर जी काही क्रियाकर्म होतात, त्याला मात्र आवर्जून हजेरी लावतात. का? गेलं पाहिजे, बरं दिसत नाही म्हणून. सर्वसामान्यपणे सासूसासरे, आईवडील यांच्यासाठीच सर्वपित्रीचा खटाटोप असतो, कारण वयपरत्वे तीच पिढी मरण पावलेली असते. अशा व्यक्तींशी नीट वागणाऱ्या लोकांना पितरं नंतर येऊन त्रास देतील, त्यांना शांत करायला जेवण घालावं लागेल, अशा अशास्त्रीय कल्पनांची भीती वाटत नाही. पितरांचं ऋण फेडायचं, कृतज्ञता दर्शवायची म्हणून सर्वपित्री साजरी करणाऱ्यांनाही हेच सांगावंसं वाटतं, आजूबाजूला जिवंत चालतीबोलती माणसं आहेत त्यांच्याविषयी त्यांच्यासमोर कृतज्ञता व्यक्त करा, ती मेल्यानंतर असं करून काहीही होणार नाही. ‘लम्हें’ या चित्रपटातला अनुपम खेरचा डायलाॅग आठवतो अशा वेळी. पल्लवीची बरसी म्हणून पूजाचा वाढदिवस साजरा न करणाऱ्या अनिल कपूरला तो सांगत असतो, ‘मेलेल्या माणसाचं तुला इतकं कौतुक, पण जी समोर जिवंत आहे तिच्याशी तू बोलतही नाहीस, हा कोणता न्याय तुझा?’
 
- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...