Home | Magazine | Madhurima | Mrinmayee Ranade writes about Diwali ank

दिवाळीचे वेध

मृण्मयी रानडे | Update - Oct 10, 2017, 12:04 AM IST

दिवाळी पुढच्या आठवड्यावर आलीसुद्धा. दिवाळीचे वेध तर केव्हाच लागलेत सगळ्यांनाच. शाळाकाॅलेजांना सुट्या लागतीलच आता, मग मुल

  • Mrinmayee Ranade writes about Diwali ank
    दिवाळी पुढच्या आठवड्यावर आलीसुद्धा. दिवाळीचे वेध तर केव्हाच लागलेत सगळ्यांनाच. शाळाकाॅलेजांना सुट्या लागतीलच आता, मग मुलंही फराळाच्या कामात हाताशी येतील. खरेदी वगैरे हळूहळू होईलच, नाही तर वीकेंड आहेच त्यासाठी. पण कामं सुरू झाली असतील तर श्रमपरिहार म्हणून हा अंक. दिवाळी अंकासाठी वाचकांकडून कथा मागवल्या होत्या, त्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. पाचसहा अंक भरतील इतक्या कथा आमच्याकडे आल्या, अजूनही येत आहेत. आजच्या अंकात त्यातल्या काही कथा वाचायला मिळतील, बाकीच्या पुढच्या अंकात. या अंकातल्या कथांमधनं एक समान सूत्र लक्षात येईल. ते आहे विज्ञानाचं, वैज्ञानिक प्रगतीचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा वेध घेण्याचं. हा वेध घेणाऱ्या लेखकांमध्ये तरुण आहेत, तसेच मध्यवयीनही आहेत, हे फार लक्षणीय वाटतं. स्त्रिया आणि पुरुष दोघांनीही कथा पाठवल्या आहेत, त्यावरून मधुरिमाची प्रतिमा ‘संपूर्ण कुटुंबासाठी वाचन पर्वणी’ अशी आहे, हे लक्षात येतं.

    विज्ञानाने आपलं आयुष्य किती बदललंय, याची आपल्याला कल्पना असते आणि नसतेही. आपल्या दोनतीन पिढ्यांमागचं जीवन आपल्याला ऐकून, कृष्णधवल छायाचित्रांमधनं पाहून माहीत असतं. त्यामुळे आपण किती पुढे आलोय ते आपण सांगू शकतो. पण, आणखी तीन पिढ्या पुढे जाऊन आपण सामान्यजन पाहू शकत नाही. ते या कथाकारांनी पाहिलंय, आणि त्यानुसार त्यांनी मानवी जीवनात होणारी गुंतागुंत त्यांच्या कथांमधून आपल्यासमोर मांडली आहे. कस्टमाइज्ड मूल देणारी एजन्सी असो की, रोबोंसोबत आयुष्य घालवणारा तरुण; अंतराळ प्रवासाचं स्वप्न पाहणारी तरुणी असो की, म्हातारपणी कंपनी म्हणून विज्ञानाचा हात पकडणारे आजोबा; या कथांमधून एक वेगळंच जग आपल्या लेखणीद्वारे उभं केलंय आपल्या गावोगावच्या लेखक मंडळींनी.

    या कथा वाचताना जसे आम्ही गुंतून गेलो, तसंच तुम्हीही रंगून जाल याची खात्री. पण वाचताना कामं मागे राहिली, बेसन जास्त भाजलं गेलं किंवा पाक एकतारीएेवजी तीनतारी झाला तर आम्ही जबाबदार नाही हं!

    - मृण्मयी रानडे, मुंबई, mrinmayee.r@dbcorp.in

Trending