आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इवान्‍का, महिला आणि बाबासाहेब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कन्या इवान्का ट्रम्प गेल्या आठवड्यात भारतात होत्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या वडलांच्या प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयांची तारीफ केली. जगभरातल्या महिलांना उद्योगधंद्यासाठी अमेरिकी सरकारच्या धोरणांमुळे प्रोत्साहन मिळेल, उत्तेजन मिळेल, असं सांगून त्यांनी महिला उद्योजकांना दिलेल्या कर्जाच्या रकमेचा दाखलाही दिला. जेव्हा महिलांचं सक्षमीकरण होतं, तेव्हाच कुटुंब आणि समाजाची प्रगती होते, असं त्या म्हणाल्या. परंतु, तंतोतंत हेच आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं आहे, याचं स्मरण उद्याच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करायलाच हवं.


बाबासाहेबांनी महिलांसाठी, फक्त दलित नव्हे तर सर्वच, जे काही केलं ते मोलाचं आहे, वगैरे शब्द अपुरे आहेत. स्वतंत्र भारतातल्या स्त्रियांना अनेक अधिकार त्यांच्या प्रयत्नांमुळेच मिळू शकले आहेत, असे अधिकार जे आपण आज गृहीत धरतो, त्यात आपल्याला काहीच नवीन वा अप्रूप वाटत नाही. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न पाहिले होते, जे पूर्ण होण्यात प्रचंड अडथळे आले म्हणून त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामाही दिला. परंतु नंतर या बिलातील मुद्दे कायद्याच्या रूपात अमलात आलेच. कोणते होते हे अधिकार? हे बिल ज्या सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित होते ते घटक होते जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत, मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार, पोटगी, विवाह, घटस्फोट , दत्तकविधान, आणि अज्ञानत्व व पालकत्व. हे सगळेच मुद्दे महिलांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी किती मूलभूत आहेत, हे खरे तर नव्याने सांगायची आवश्यकता नाही, परंतु तिचं स्मरण वारंवार करून द्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. बाबासाहेब हा एक ब्रँड केला गेला आहे, तोही एका विशिष्ट वर्गाचा. बाबासाहेब आणि त्यांचं कर्तृत्व अशा कोणत्याही कशाच्याही मर्यादेत बसवण्यासारखं नाही, हे तर निश्चित.


- मृण्मयी रानडे, मुंबई 
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...