आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेस कोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज कामाला जाण्यापूर्वी आपल्यातल्या बहुतेकांना विचार करावा लागतो तो कोणते कपडे घालायचे याचा. विद्यार्थ्यांना काॅलेजात गणवेश नसतो, तरीही साधारण कोणते कपडे घातलेले चालतात, याचे नियम असतातच. ते अनेक कार्यालयांमध्येही असतात. काही ठिकाणी फाॅर्मल म्हणजे औपचारिक कपडे आवश्यक असतात. आता या फाॅर्मलमध्ये काय चालतं, ते प्रत्येक कार्यालय ठरवतं. स्त्रियांसाठी कुठे यात साडी वा सलवार कुडता चालतो, तर कुठे केवळ ट्राउजर्स व शर्ट चालतो. पुरुषांनीही ट्राउजर्स आणि फुल शर्ट, क्वचित टायही, घालणं अपेक्षित असतं.

भारतातल्या उकाड्यात टाय किती त्रासदायक असतो, हे माहीतच आहे आपल्याला. अनेक कार्यालयांमध्ये शुक्रवारी, शनिवारी जीन्स आणि टी-शर्ट चालतो. पण बऱ्याचदा तोही एक गणवेश होऊन बसतो! अमुक पद्धतीची पादत्राणंही अनेक ठिकाणी बाद असतात. या सगळ्यामागे आपल्या कर्मचाऱ्यांनी नीटनेटकं, आदरणीय दिसावं, आपल्या कंपनीची प्रतिमा चांगली राहावी, जेणेकरून व्यवसाय भरभराटीला येईल, अशी एक कल्पना असते. परंतु, कधी याचा अतिरेकही होतो. हे तथाकथित फाॅर्मल कपडे अनेकांना सोयीचे वाटत नाहीत, ते आरामदायी नसतात, निव्वळ नियम पाळायचे म्हणून ते घातले जातात. (नुकतीच एक बातमी वाचली की, महिला पोलिसांना बुटांचा अतिशय त्रास होतो, कारण ते बूट पुरुषांच्या पायासाठी बनवलेले असतात. आता तामिळनाडूत महिलांच्या पायाची रचना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी बूट बनवण्यात येणार आहेत. तासनतास उभं राहून ड्यूटी बजावणाऱ्या महिला पोलिसांना यामुळे मोठाच दिलास मिळेल, याची खात्री वाटते.)
 
या सगळ्यापेक्षा वेगळा विचार करणारी जगप्रसिद्ध व्यक्ती म्हणजे फेसबुकचे सीईओ, मार्क झुकेरबर्ग. ते कायम राखी रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट आणि निळी जीन्स घालतात, आॅफिसला जाताना वा कोणालाही, अगदी राष्ट्राध्यक्षांनाही, भेटायला जाताना. साहजिकच, फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनाही असा कोणताही ड्रेस कोड लागू नाही. आणि तरीही फेसबुक ही जगातील यशस्वी कंपन्यांपैकी एक आहे, झुकेरबर्ग जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणजे कपड्यांचा आणि कंपनी यशस्वी होण्याचा संबंध नाही. परंतु, याचा अर्थ असा नाही की, गबाळे, अस्ताव्यस्त, वा अस्वच्छ कपडे घालून शाळा, काॅलेज वा आॅफिसात जायचं स्वातंत्र्य असावं. पण ड्रेस कोडला किती महत्त्व द्यायचं, ते यातनं लक्षात आलं तरी पुरे. शेवटी विद्यार्थी वा कर्मचाऱ्यांचा आनंद, सोय, महत्त्वाची ना?
काय वाटतं तुम्हाला? असा अनुभव तुम्हालाही आलाय का, नको तो गणवेश असा?
 
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...