आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नविन वर्षाच्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तर, एकविसाव्या शतकातलं सतरावं वर्ष सुरू होऊन दोन दिवस लोटलेत. ‘हॅप्पी न्यू इयर’ म्हणायला नवीन वर्षातला तिसरा दिवस उजाडलाय, अंमळ उशीरच झालाय हं. तरीही न्यू इयरची पार्टी करणारे लोक, त्या पार्टीला नावं ठेवणारे लोक, ३१ डिसेंबरच्या रात्री टीव्हीवरच्या विविध वाहिन्यांवरचे करमणुकीचे कार्यक्रम पाहणारे लोक, ३१च्या रात्री एरवीप्रमाणेच रात्री साडेदहाला गुडुप झोपणारे लोक, एक जानेवारी या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नव्या जोमाने व्यायाम सुरू करणारे लोक, नवीन वर्षात काय काय करायचं (आणि करायचं नाही) त्याचा संकल्प सोडणारे लोक, तीन-चार दिवसांतच हा संकल्प मोडणारे लोक, यांतले तुम्ही कोणीही असाल, किंवा नसालही, तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.

नवीन वर्षाबद्दल उत्सुकता वाटणं, या वर्षी तरी काहीतरी वेगळं घडेल, चांगलं होईल आपल्या आयुष्यात/आपल्या देशात, अशी आशा वाटणं अत्यंत नैसर्गिक मानवी वृत्ती आहे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक तक्रारी असतात, कधी त्यांवरचं उत्तर आपल्या हातात असतं, कधी नसतंही. ही त्रासदायक परिस्थितीही कॅलेंडर बदलल्यानंतर बदलेल, असं आपल्याला वाटत असतं. कुणाला नोकरीचा कंटाळा आलेला असतो, कुणाला आजारपण नकोसं झालेलं असतं. कुणाला नवीन घर हवं असतं, कुणाला दोनाचे चार करायचेच असतात. कुणासमोर अभ्यासाचं आव्हान असतं, कुणासमोर नवीन जबाबदाऱ्यांचं. सगळ्यांनाच हे नवीन वर्ष हुरूप देणारं असतं. मागच्या वर्षाचं मागे राहिलं, आता नवीन वर्षात नवीन होईल, असं आपल्याला वाटत असतं. म्हणून नवीन वर्षाचं कौतुक उत्साहात करायचं असतं.
 
आपला उत्साह, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद दुसऱ्या कोणाचा उत्साह वाढवू शकतो, दुसऱ्याला आनंदी करू शकतो, म्हणून आपण उत्साहात राहायचं, आनंदी राहायचं. ‘जब वी मेट’मध्ये आदित्य गीतला म्हणतो ना, अच्छी दिखेगी तो अच्छा होगा तेरे साथ! तसं. तुमच्या सोबत हा अानंद लुटायला, म्हणजे आजच्या भाषेत शेअर करायला, मधुरिमा टीम आहेच. पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर.
बातम्या आणखी आहेत...