आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्ल होस्‍टेल आणि आपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांतलं हे अनेकांचं निरीक्षण आहे, खासकरून ग्रामीण भागातलं. मुली खूप मोठ्या संख्येने शिकतायत, शिकायची इच्छा व्यक्त करतायत, शिकण्यासाठी जिवापाड मेहनत करायची तयारीही त्यांची आहे. घरातली कामं, शेतावरची कामं, सगळं सांभाळून त्यांना शाळेत आणि नंतर काॅलेजला जायचंय. आणि त्यानंतर नोकरी करायचीय. (पण शेजारच्याच लेखात वंदना खरे म्हणतात तशी त्यांची नोकरीची संधी कमीकमी होत जातेय, हेही खरंच.) हा बदल या एकविसाव्या शतकात जरा जास्तच जोमाने झालेला दिसतोय. पण या बदलाला सामोरं जायला, सामावून घ्यायला आपली प्रशासन व्यवस्था, सरकार, समाज अजून तयार नाहीत की काय, असा प्रश्न पडतो. या मुली शिकायचं म्हणतात, आईवडीलही कधी समजूनउमजून तर कधी मनात नसताना, त्यांना शिकायची परवानगी देतात. शाळा गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी होऊन जाते, पण काॅलेज मात्र जवळ उपलब्ध असतंच असं नाही. त्यामुळे या मुली घर सोडून काॅलेजच्या ठिकाणी जाऊन होस्टेल, पेइंग गेस्ट किंवा भाड्याने घर घेऊन राहतात. छोट्या गावातून मोठ्या शहरात येणं, हा त्यांच्या आयुष्यातला तोपर्यंतचा महत्त्वाचा बदल असतो. त्यांनीही इतका मोकळेपणा, वातावरणातला आणि वागण्यातला आतापर्यंत पाहिलेला, अनुभवलेलाच नसतो. चंद्रपुरातल्या एखाद्या खेड्यातली मुलगी पुण्यात शिकायला येऊन होस्टेलवर राहायला आली की, तिला कसं वाटेल, याची कल्पना आपण करू शकतो. आपल्या वागण्यावर, कपड्यांवर, भाषेवर, कृतींवर लक्ष ठेवायला कोणी नाही, हे कळल्यावर त्यांना किती मोकळं वाटत असेल, हेही आपल्याला कळू शकतंच. मग हा अचानक आणि नव्याने सापडलेला मुक्तपणा काही समाजमान्य नसलेल्या कृतींतूनही व्यक्त होऊ शकतो. उदा. धूम्रपान, मद्यपान, वगैरे. मुद्दा हा आहे की, आपल्याकडे अशा मोठी स्वप्नं पाहणाऱ्या, पण बावचळलेल्या, मुली आल्या आहेत, त्यांच्याशी कसं वागायचं, हे विद्यापीठ/काॅलेज प्रशासनाला, होस्टेल रेक्टरना उमजलेलं आहे का? त्या आणि स्थानिक मुली यांच्यापुढच्या समस्या वेगळ्या असतात, त्यांची उत्तरं हे सगळं गृहीत धरून शोधावी लागतील, हे लक्षात घेतात का प्रशासनं? 

या परिस्थितीवर आपल्याला लवकरात लवकर उपाय शोधायला हवाय. कारण बीएचयूमध्ये जे झालं ते थोड्याफार प्रमाणात सगळीकडेच होतंय, हे नक्की.
 
- मृण्मयी रानडे, मुंबई mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...