आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्‍तरीच्‍या शुभेच्‍छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सत्तरीतल्या माणसाच्या गाठीशी प्रचंड अनुभव असतो, जीवनाविषयीची प्रगल्भ समज व उमज असते. आयुष्याच्या सायंकाळी भल्याबुऱ्या अनेक आठवणींच गाठोडं जमा झालेलं असतं. तसंच सारासार विचार करून काय जपून ठेवायचं नि काय सोडून द्यायचं, याचीही पुरेशी जाण अालेली असते. आपल्या भवताली अशा अनेक व्यक्ती वावरत असतात. आज सत्तरीतल्या या आजीआजोबांची आठवण येण्याचं कारण, भारतीय लोकशाही आज सत्तर वर्षांची होतेय. खूप मोठा पल्ला एक राष्ट्र म्हणून व एक लोकशाही म्हणून आपण गाठलाय. त्यामुळे एकाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व वाचकांना मनापासून शुभेच्छा. स्वातंत्र्याचं महत्त्व आपल्याला माहीत असतंच (असायला हवं खरं तर!). आणि इतक्या वर्षांनंतर हेही कळू लागलंय की, स्वातंत्र्य जसं आपल्याला हवं असतं, तसंच ते दुसऱ्या व्यक्तीलाही असतं. स्वातंत्र्याचं मोल सर्वांसाठी सारखंच असतं, त्यामुळे स्वत:चं स्वातंत्र्य जसं प्राणपणाने जपायचं, तसंच इतरांचंही, हा धडा या सत्तर वर्षांत आपल्या शिकलेलो आहोतच.
 
मधुरिमाच्या वाचकांमध्ये अनेक जण असतील ज्यांचा जन्म १९४७मध्ये झालाय. तेही यंदा सत्तरीचे झाले असतील, होतील. ते स्वतंत्र भारताचे खरे प्रतिनिधी म्हणायला हवेत. त्यांनी हे राष्ट्र उभारताना पाहिलंय, उभारणीत त्यांचा थेट सहभाग आहे. त्यांनी सत्तर वर्षांतले बदल प्रत्यक्ष आणि थेट अनुभवलेत. या वाचकांना स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांबद्दल काय वाटतं, ते जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता आहे. त्यांचं बालपण आणि आता त्यांच्या नातवंडांचं बालपण, त्यांचं तारुण्य आणि त्यांच्या मुलांचं तारुण्य यात त्यांना काय फरक किंवा साम्यं आढळतात? त्यांना स्वातंत्र्याबद्दल, लोकशाही राजवटीबद्दल, त्यामुळे मिळणाऱ्या फायद्यांबद्दल काय वाटतं? राजकारण बाजूला ठेवूनही आपण या मुद्द्यांची चर्चा करू शकतोच, कारण लोकशाहीचं तत्त्व राजकारणाच्या पलिकडचं आहे. तुमचे विचार लिहून पाठवा. आजचा दिवस तर आपण साजरा करूच, पण स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्य साजरं करणं त्याहून अधिक गरजेचं आहे, ते काहीसं कठीणही असलं तरी.
जय हिंद.
 
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...