आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्‍दवैभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रमाण भाषा, बोली भाषा यांमधला वाद सध्या सोशल मीडियावर उफाळलेला आहे. मराठी भाषा कशी बिघडतेय, अनेक शब्द आपण न वापरल्याने अडगळीत गेले आहेत, हिंदी व इंग्रजीचा प्रभाव फार वाढलाय, अशी खंत फार वर्षांपासून व्यक्त केली जात आहेच, त्यात काही नवीन नाही. परंतु या नवीन वादाने मराठीच्याच बोली व प्रमाण भाषांमध्ये, किंबहुना या भाषा बोलणाऱ्यांमध्ये, फूट पाडलीय.

प्रमाण भाषाच वापरली पाहिजे, तरच मराठी वाचेल असा मुद्दा एक बाजू मांडते. तर इतक्या शेकडो बोलीभाषांचं काय, त्यांना काय मराठी म्हणायचं नाही का, असं दुसरी बाजू म्हणते. महाराष्ट्रात मराठीच्या इतक्या बोली आहेत की, ते मराठीचं वैभवच मानायला हवं. दिव्य मराठीच्या ज्या ठिकाणी आवृत्ती आहेत, तिथल्या तिथल्या भाषा मोजायच्या म्हटल्या तरी अशक्य होईल. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, या भागांतल्या वाचकांना हे पटेल. तालुक्यागणिक भाषा बदलते, हेल बदलतात, शब्दांचे उच्चार नि अर्थ बदलतात. हे शक्य होतं कारण आपली भाषा लवचिक आहे. करते आहे (प्रमाण), करतेय (बोली), करायलेय (कोल्हापूर, सांगली), करून राहिलेय (नागपूर, विदर्भ) ही सगळी क्रियापदं एकच गोष्ट सांगतात. आणि ती सगळी मराठीच आहेत. मग त्यात योग्य नि अयोग्य कसं ठरवणार? आणि का ठरवावं कोणी?
 
सोशल मीडियामुळे या सगळ्या बोलीभाषा, ज्या अगदी आतापर्यंत केवळ बोलल्या जात होत्या, लिहिल्या जाऊ लागल्यात. त्यामुळे प्रमाण भाषा बोलणाऱ्यांना, हो तीही काही जणांची बोलीभाषा आहेच की, या बोलींचा आनंद घेता येऊ लागलाय. “अस्का कराईलीस” म्हणजे असं का करते आहेस, (कोल्हापूर), “मीबी गेलथो” म्हणजे मीही गेले होते, (नगर), “बर्मंग्ठिव्का” म्हणजे बरं मग, ठेवू का (फोन)? (सातारा) - असं वैविध्य विनाेद म्हणून सोडून देऊही आपण, पण तेच त्या त्या प्रांताचं वैशिष्ट्य आहे, हे विसरून कसं चालेल? नागपुरी माणसाला लंडनमध्ये एखाद्या दुकानात समजा, ‘काय करतो बे?’ असं कोणी बोलताना कानावर पडलं तर त्याला माहेरचं कोणी माणूस भेटल्याच्या आनंदाचं भरतं येणारच. ते आपण समजूही शकतो.
 
अशी तुमच्याही भाषेची गंमत असणारेय. त्यामुळे गंमतीजमती झालेल्या असणारेत. कधी विनोद घडला असेल तर कधी प्रसंग ओढवला असेल. ते कळवा ना आम्हाला, म्हणजे सगळेच आपल्या या भाषावैभवाचा आनंद घेऊ शकतील. आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहायलोय बरं.
 
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...