आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Writes About Menstrual Cycle. Madhurima, Divya Marathi

आउट ऑफ कोर्स?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मासिक पाळी हा स्त्रीजीवनाचा, पर्यायाने मनुष्यजातीसाठी, अपरिहार्य भाग. तरीही त्याबद्दल अनेक अमानुष वाटाव्या अशा प्रथा, समज-गैरसमज, अज्ञान यांची रेलचेल आहे आपल्याकडे. शिवाशीव पाळणं अजूनही दिसून येतं, पण आरोग्याची समस्या तर अस्पर्श राहण्याच्या अवमानाहून मोठी.

या विषयावरची मिठाची गुळणी फोडण्यासाठी हे नवीन सदर आमच्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींसाठी. ज्या अनुभवांमधनं इतरांना शिकायला मिळेल, अशा, पुरुष व स्त्रिया दाेघांच्या, मनोगतांचं स्वागत आहे.

पहिली पाळी नीटच आठवते. अर्थात, मला वाटत नाही कोणीही स्त्री ते कधीच विसरत असेल. पण ते काही नाट्यमय वगैरे नव्हतं सुदैवाने. शाळेत एक माहितीपट दाखवला होता आम्हा मुलींना, सहावी-सातवीत असू तेव्हा. रोहिणी हट्टंगडी होत्या त्यात, एवढंच आत्ता आठवतंय. पण त्यातून खरंच काही शिकलं असेन, कारण भीती वाटली नव्हती, एवढं लक्षात आहे. माहीतही होतं की, असं काहीतरी होतं. किंबहुना कधी आपली पाळी येईल, त्याची उत्सुकता होती. मैत्रिणींमध्ये गप्पा मारताना उल्लेख व्हायचा. तेव्हा लैंगिक शिक्षणात फक्त एवढंच असायचं, बाकीची माहिती मिळायला इंग्रजी कादंबऱ्या हा माझा वैयक्तिक स्राेत होता. आमच्या घरात देवदेव नव्हतं फार, आईही नोकरी करत होती. परंतु माझ्या आजोळी कोकणात ते तीन दिवस अगदी कडक सोवळं असायचं. त्यामुळे आजोळी जाताना नेमकी पाळी येणार नाही ना, अशी भीती असायची आणि त्या भीतीमुळेच की काय, ती यायचीच तेव्हा.

एक बरं होतं की, मला फार त्रास व्हायचा नाही त्या दिवसांत, त्यामुळे रोजची कामं, काॅलेज, भटकंती वगैरे सुरळीत सुरू असायचं. अर्थात डाग दिसतोय की काय, याची भीती असायचीच, विशेषत: दिवसभर बाहेर काढल्यानंतर. काॅलेजला असताना टाॅयलेट नीट होती, काही वाटायचं नाही. पण नोकरी लागल्यावर जरा कठीण वाटू लागलं. मुंबईच्या लोकलमधला तासाभराचा प्रवास, दिवसभर वार्ताहर म्हणून फिरून संध्याकाळी आॅफिस गाठेपर्यंत त्रास व्हायचा. सासरी थोडं वेगळं वातावरण होतं. अगदी शिवाशीव नसली तरी पूजा करायची नाही, प्रसाद घ्यायचा नाही, देवळात जायचं नाही हे निर्बंध होते. ते सगळं माझ्यासाठी फार कठीण गेलं स्वीकारायला. मी तर एरवीही देवळात न जाणारी, त्यामुळे मुद्दाम त्या दिवसांत जावं की नाही, अशी द्विधा मन:स्थिती व्हायची नाही. परंतु, तेरी भी चुप मेरी भी चुप या खाक्याने मी वेळ पडल्यास तेही करत असे. प्रसाद वगैरे नाकारणं तर शक्यच नव्हतं. अापण अपवित्र आहोत, अशुद्ध आहोत, हा विचारच झेपण्यासारखा नव्हता, अगदी सुरुवातीपासून. त्यामुळे हे सगळं का नाकारायचं, हा प्रश्न कायम डोक्यात होता. मासिक पाळी हा महिला सहकाऱ्यांना जवळ आणणारा एक घटक होऊ शकतो, हेही नोकरीत असताना लक्षात आलं. एका कार्यालयात आम्ही दोघीतिघीच मुली होतो, बाकी सगळे बाप्ये. अचानक पाळी आली तर नॅपकिन हवा म्हणून आम्ही तो आॅफिसच्या खणात ठेवत असू. तो दुसरीकडून घ्यावा लागला तर दुसऱ्या दिवशी आणून ठेवायचा, ही आमची पद्धत. म्हणजे गरजेला एक नॅपकिन आॅफिसात हमखास सापडे.
एमसी किंवा पीरियड्स म्हणत असू आम्ही तेव्हा. आता आमचा मैत्रिणींचा एक ग्रूप आहे, त्यात आम्ही पाळीलाच मैत्रीण म्हणतो! म्हणजे काही प्लॅन करत असू, तर एखादी तर म्हणणारच, ए माझी तेव्हाच येणारेय हं मैत्रीण, नंतर करू या.

एकदा एका मित्राचा फोन आला, तामीळ होता तो. म्हणाला, आज माझी बायको तुझ्याकडे काॅफी प्यायला येऊ शकते का संध्याकाळी, she is out of course! मला तीनदा विचारूनही अर्थच कळेना. अखेर कळला, मी अर्थातच तिला काॅफी वगैरे पाजली. पण तेव्हा कळलं की, मुंबईत अत्यंत शिकलेली माणसंही ही पाळीची अस्पृश्यता पाळतात. आउट आॅफ कोर्स हा शब्द खास तामीळ लोक वापरतात पाळी सुरू असलेल्या बाईसाठी. या तीन दिवसांत तिला स्वयंपाकघरात प्रवेश नसतो, पुरुषमंडळी किंवा घरातल्या इतर स्त्रिया स्वयंपाक व इतर कामं करतात. अगदी तीन खोल्यांचं छोटंसं घर असेल तरीही. (याचा एकमेव फायदा तेव्हा लक्षात आला तो असा की, बहुसंख्य तामीळ पुरुषांना यामुळे उत्तम स्वयंपाक येत असतो.)
पत्रकार म्हणून महाराष्ट्रात फिरताना वा मुंबईतल्या वस्त्यांमध्ये हिंडताना सर्वसामान्य महिलांना पाळीच्या दिवसांत काय काय भोगावं लागत असेल, हे दिसू लागलं. स्वच्छ टाॅयलेट नसणं, नॅपकिन्सबद्दल माहिती नसणं वा ते न परवडणं, कापड वापरत असल्यास ते स्वच्छ धुवायला पाणी नसणं, ते कापड कडक उन्हात वाळवणं शक्य नसणं असं काय काय डोळ्यांसमोर येऊ लागलं. त्यावर लिहिलंही अनेकदा. पण ही समस्या इतकी खोलवर रुजलेली, इतकी जुनी होती की, तिच्याबद्दल खुलेआम बोललंही जात नव्हतं. मग तिचं निराकरण दूरच राहिलं. म्हणूनच मुलगी मोठी होऊ लागली, तेव्हा तिला हे सगळं समजावून सांगितलं. माझ्या एका डाॅक्टर वहिनीने तिच्याशी गप्पा मारल्या. ही एक नैसर्गिक शारीरिक उत्सर्जन क्रिया आहे, हे बिंबवलं. त्यामुळे तिची पहिली पाळी आली, तेव्हा ती कूल होती. ती आणि तिचे मित्रमैत्रिणी या विषयावर बोलतात, हे महत्त्वाचं वाटतं. ती तिच्या बाबाशी या विषयावर बोलू शकते, बोलते, हेही महत्त्वाचंच.
(mrinmayee.r@dbcorp.in)