परवा, १२ तारखेला स्वामी विवेकांनंद यांची जयंती. त्यानिमित्त देशभरात युवा दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमांची छायाचित्रं, बातम्या वाचून प्रश्न निर्माण होतात. भारताच्या लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग युवक आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लहान मुलांची व ज्येष्ठ नागरिकांची संख्या अतिशय मोठी आहे. म्हणजे त्यांच्या खांद्यावर मोठीच जबाबदारी आहे, माणसं सांभाळण्याची आणि देश पुढे नेण्याची. पण या युवकयुवतींना नेमकं काय हवंय, त्यांची ही जबाबदारी सांभाळायची तयारी आहे का, त्यांना कशाकशाचं आव्हान वाटतंय, कसले ताण वाटताहेत, हे आपल्याला नीटसं ठाऊक नाहीये. अमुक एक वय ओलांडलं म्हणजे अमुक एक जबाबदारी सांभाळता येते, या गृहीतकावर अनेक नियम/कायदे आधारलेले असतात.
लग्नाचं वय, मतदानाचं वय, मद्यपानाच्या परवान्याचं वय आणि निवडणुका लढवण्याचं वय ठरलेलं असतं, ती व्यक्ती ती विशिष्ट जबाबदारी पेलायला सक्षम आहे की नाही, हे मात्र तपासून पाहिलेलं नसतं. तो एक अनुभवांवर आधारित अंदाज असतो फक्त. शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं हा काही वर्षांपर्यंत अत्यंत नैसर्गिक असलेला जीवनक्रम आता तितकासा नैसर्गिक राहिलेला नाही, मुलग्यांसाठीही नाही व मुलींसाठीही. जीवनातली आव्हानं, ताणतणाव बदलले आहेत, वाढले आहेत. वरवर ही पिढी धमाल, गंमत, चिल आउट, पार्टीज करताना दिसत असली तरी त्यांच्या आत काय चाललंय, ते ना त्यांना कळतंय ना आपल्याला. त्यांच्यासमोरच्या अनिश्चिततेचा अंदाज नाहीये कुणालाच.
म्हणून, या युवा दिनाचं औचित्य साधून मधुरिमा वाचणाऱ्या तरुण पिढीला एक आवाहन करतोय या अंकातून. वय वर्षं १८ ते ३५ या गटातील व्यक्तींनी आमच्याकडे लिहून पाठवा - तुम्हाला तुमचं भविष्य काय दिसतंय? सध्या तुमच्यासमोर आव्हानं कोणती आहेत? त्या आव्हानांना सामोरं जायला तुम्ही तयार आहात का? तुम्हाला पालकांकडून, शिक्षकांकडून, समाजाकडून, मोठ्यांकडून नेमकी काय मदत हवीय? जे मनात असेल ते बोला, मदतीला अनेक हात पुढे येतील याची खात्री बाळगा.
वयाने आणि मनाने तरुण असलेल्या सर्व वाचक मित्रमैत्रिणींना युवा दिनाच्या शुभेच्छा.
मृण्मयी रानडे, मुंबई