आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप के मरने के बाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका मैत्रिणीच्या दुसरीतल्या मुलीने तिला नुकतंच सांगितलं, अतिशय निरागसपणे, ‘मम्मा, आप के मरने के बाद मैं आप की आँखें डोनेट करनेवाली हूँ!’ मुलीचे हे उद्गार ऐकून मैत्रीण चकित झालीच, पण तिला कौतुकही वाटलं. 

मधुरिमाच्या २१ फेब्रुवारीच्या अंकात, तिसऱ्या पानावर संतोष आंधळे यांनी आराध्या मुळे या लहानगीची गोष्ट सांगितल्याचं तुम्हाला आठवत असेल. आराध्याचं हृदय अतिशय नाजूक अवस्थेत होतं आणि तिला नवीन हृदयाची आवश्यकता होती. एक वर्षापासून ती हृदय प्रत्यारोपणाच्या यादीत होती, वाट पाहात होती. या आराध्याला गेल्या आठवड्यात जीवनदान मिळालं अखेर. सुरतमधला सोमनाथ शहा हा सव्वा वर्षाचा चिमुकला अपघातात गंभीर जखमी झाला व मेंदूमृत घोषित केला गेला. त्याचं हृदय मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात झालेल्या एका शस्त्रक्रियेद्वारे आराध्यावर प्रत्यारोपित करण्यात आलं.

गेल्या दोन-तीन वर्षांत अवयवदानाच्या बातम्या मोठ्या संख्येने आपल्याला वाचायला मिळू लागल्या आहेत. वैद्यकशास्त्र इतकं प्रगत झालंय की, हृदय, मूत्रपिंड, यकृत, त्वचा, डोळे (नेत्रपटल), इतकेच नव्हे, तर फुप्फुसं  व स्वादुपिंडंही दान करता येतात, गरजू व्यक्तीवर प्रत्यारोिपत करता येतात. तसंच सरकार व स्वयंसेवी संस्थांच्या जागृती अभियानांमुळे खरोखरच सामान्य माणसांपर्यंत याविषयीची माहिती पोचू लागली आहे, त्यामुळे डाॅक्टर जेव्हा रुग्णांच्या नातलगांशी याविषयी बोलतात तेव्हा त्यांचं म्हणणं मानण्याकडे कल वाढू लागला आहे. 

आपल्या आजूबाजूला पाहिलं तर असंही लक्षात येईल की, लहान मुलांना याविषयी बरीच माहिती असते. कोणताही बदल घडवून आणायचा झाला तर मुलांमध्ये तो घडला पाहिजे, म्हणजे भविष्यकाळात त्या बदलाचे परिणाम दिसून येतील, असं म्हणतात. अवयवदानाच्या बाबतीत तर मुलांची माहिती नक्कीच अधिक आहे, त्यांच्यासाठी तो एक स्वाभाविक घ्यायचा निर्णय आहे, तोच पहिला पर्याय आहे. म्हणून आपण मोठ्यांवर मोठी जबाबदारी आहे, कारण शेवटी घरात मृत्यू झाल्यावर पुढे काय करायचं याचा निर्णय आपल्या हातात असतो. बरं, यासाठी मृत व्यक्तीने देहदानाचा वा अवयवदानाचा अर्ज भरलेला असण्याचीही आवश्यकता नाही, त्या व्यक्तीच्या नातलगांनी हा निर्णय घ्यायचा असतो. जाताजाता, बातमी वाचनात आली की, बंगळुरूमध्ये ज्यांची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली त्या पत्रकार गौरी लंकेश यांचे डोळे त्यांच्या कुटुंबीयांनी दान केले आहेत.

- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...