आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्या दिव्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंधार, लाक्षणिक आणि प्रत्यक्ष, दूर करावाच लागतो. लाक्षणिक अंधार दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यातला सर्वात महत्त्वाचा आहे शिक्षण. प्रत्यक्ष अंधार दूर करण्याचा मार्ग म्हणजे प्रकाशाची निर्मिती. प्रकाशासाठी आवश्यक असतो दिवा. मग तो कुठलाही असो, विजेवर चालणारा, सौरऊर्जेवर चालणारा, केरोसीनचा वा तेलतुपाचा. या दिव्याची अमावास्या आज अनेक घरांमध्ये साजरी केली जात असेल. अंधारातून बाहेर काढणाऱ्या दिव्याचं पूजन ही आपली परंपरा, नदी, सूर्य, वृक्षवल्ली, अग्नी, जमीन, या इतर नैसर्गिक स्त्रोतांच्या पूजनासारखी. कारण प्रकाश आवश्यक आहे, प्रगतीसाठी. तो प्रकाश देणारा दिवा, म्हणून त्याचं पूजन.
तुम्ही भले माळ्यावर ठेवलेल्या जुन्या समया काढून त्या चिंचेने स्वच्छ नका करू, घरातले इतर दिवे घासूनपुसून लख्ख नका करू, कणकेचे दिवे करून नका खाऊ; पण संध्याकाळ, जिला आपण दिवेलागणीची वेळ असंच म्हणतो, झाली की दिवा लावालच नक्की. दिवा, मग ते निरांजन असो किंवा ट्यूबलाइट/बल्ब.
उद्या श्रावण लागतोय, गाव असो की, शहर; श्रावण इफेक्ट दिसतोच. यंदा बहुतेक ठिकाणी पाऊस चांगला झालाय, त्यामुळे हिरवंगार झालंच आहे सगळं. श्रावणातले सण, उत्सव साजरे करायला अगदी योग्य वातावरण आहे. निसर्गाचे आभार मानायचे, निसर्गाच्या जवळ जायचं, निसर्गाची ओळख करून घ्यायची आणि त्याबरोबर काही छान क्षण कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, आप्तेष्टांसोबत घालवायचे, हा या सणांमागचा उद्देश. नवविवाहितांना नवीन परिवारात सामावून घ्यायची चांगली संधी मिळते या सणांमुळे. घरातल्या कामात गुंतलेल्या स्त्रियांना हसण्याखिदळण्याची संधीही मिळते. बच्चेकंपनीला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात, त्यांनाही हुंदडायला मिळतं. शाळांना सुटी असते, अर्धा दिवसच जायचं असतं. मस्त हलकंफुलकं वातावरण असतं या दिवसांत. आपणही आपले नेहमीचे ताण कमी व्हावेत, म्हणून या आनंदात सहभागी होणं आवश्यक आहे. परंपरा, रूढी यांतलं चुकीचं मागे ठेवून चांगलं ते अनुसरणं गरजेचं आहे, तीच तर श्रावणाची गंमत आहे.
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...