आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाच्‍या मागे काय आहे ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणताही, कशाचाही अर्ज भरायचा असेल तर आपलं नाव लिहावं लागतं. आणि त्या नावामागे काय लिहायचं ते स्पष्ट करावं लागतं. उदा. श्री, कु, सौ, Mr, Mrs, वा Ms.
का?

अर्ज भरणारी व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, हे पडताळण्यासाठी हा प्रश्न. तसंच, व्यक्ती विवाहित आहे की अविवाहित, हेही.

एक मिनिट.

व्यक्ती विवाहित आहे वा नाही, हे स्त्रीच्या ‘सौ’ किंवा ‘कु’वरून कळणार. पुरुषांचं काय? की त्यांचं वैवाहिक स्टेटस काहीही असलं तरी काही फरक पडत नाही?

मग बायांचंच लग्न झालंय की नाही, लग्न टिकून आहे की घटस्फोट झालाय, वगैरे माहिती कशाला हवी असते? यामुळे काय फरक पडणार असतो?

पण माणूस फक्त पुरुष आणि स्त्री या दोन वर्गांत विभागला जाऊ शकत नाही, त्यातही अनेक प्रतलं आहेत. काही जण वरकरणी पुरुष दिसत असले तरी आतून त्यांना आपण स्त्री असल्यासारखं वाटतं, काहींना उलटं. काहींना आपण दोन्ही आहोत, असं वाटतं. काहींना कोण आहोत, हेच कळत नाही. यांचं प्रमाण कमी असलं, तरी तसे लोक आहेत, आणि त्यांनी तसं असणं हा त्यांचा हक्क आहे. ते आजारी नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भारतात अनेक संस्थांनी आपल्या अर्जांवर third gender म्हणजे पुरुष वा स्त्री यांच्यापेक्षा वेगळे, असा रकाना ठेवायला सुरुवात केली आहे. असं सकारात्मक पाऊल उचलणाऱ्या संस्थांचं प्रमाण फारच कमी असलं तरी त्या आहेत, ही फार दिलाशाची बाब आहे. (प्रमाणपत्रं वा ओळखपत्रांवर आईचं नाव लावणं, हेही असंच एक सकारात्मक व महिलांना योग्य स्थान देणारं पाऊल आहे.)

गेल्या आठवड्यात न्यूयाॅर्क टाइम्सने एका बातमीत एका व्यक्तीसाठी Mx हे संबोधन वापरलं आहे. गेल्या काही वर्षांपासून इंग्रजीत Mrsच्या ऐवजी Ms हे विवाहाशी संबंधित नसलेलं संबोधन वापरलं जातं. अनेकदा मराठीत श्रीमती हे संबोधन त्यासाठी वापरलेलं आढळतं. Mx (उच्चार मिक्स) हे त्यापुढचं पाऊल आहे. Mx म्हणजे मिश्र लिंगभाव असणारी व्यक्ती.

आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण त्या वाटेवरनं तरी आपण चालतोय ना, याची खात्री करून घ्यायला हवी. हो ना?
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...