आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब्रेटींचे जीवनसाथी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजची कव्हर स्टोरी एका निरीक्षणावर आधारलेली आहे, ते म्हणजे महापुरुषाची किंवा कोणत्याही क्षेत्रातल्या उत्तुंग व्यक्तीची पत्नी असणं मोठं जिकिरीचं काम. याला जोड अशी देऊ शकतो की, कोणत्याही ‘सेलेब्रेटी’चा वैवाहिक जोडीदार असणं, पुरुष असो वा स्त्री, हे सोपं नाही. मराठी वाचकांना सुनीता देशपांडे यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या आत्मचरित्राच्या माध्यमातून पहिल्यांदा याची स्पष्ट ओळख झाली. त्यासाठी सुनीताबाईंवर अनेकांनी यथेच्छ टीकाही केली, पण त्यामुळे सत्य लपत नाही. यानंतर आलेली अनेक लेखकांच्या पत्नींची आत्मचरित्रं, उदा. सुमा करंदीकरांचं ‘रास’, वा यशोदा पाडगांवकरांचं ‘कुणास्तव कुणीतरी’, माधवी देसाईंचं नाच ‘गं घुमा’ इ. यांमधनं हेच दिसून आलं. पु. ल. देशपांडे असोत की विंदा करंदीकर की मंगेश पाडगांवकर; त्यांची पत्नी असणं, त्यांचा संसार सांभाळणं, त्यांची काळजी घेणं, त्यांचं लेखन जोपासणं, चाहत्यांना हाताळणं हे सगळे येरागबाळ्याचे काम नोहे. विशेषकरून तुम्ही जेव्हा समाजाच्या दृष्टिकोनातून एक सामान्य व्यक्ती असता तेव्हा हे फारच जाणवणारं. काहीही केलं तरी कोणीतरी वाईट म्हणणारच, अशी इकडे आड तिकडे विहीर अवस्था या व्यक्तींची नेहमीच असते. त्यामुळे त्यांना स्वत:ला हे आधी ठरवावं लागतं की, त्यांच्यासाठी काय/कोण महत्त्वाचं आहे, पती व त्याची कला/काम की समाजाची प्रतिक्रिया? आणि त्या भूमिकेवर ठाम राहावं लागतं. पतीच्या कामात कसर दिसली तरी तिलाच जबाबदार धरलं जाण्याची दाट शक्यता असते. शिवाय तिच्या भल्याबुऱ्या वर्तनामुळे पतीच्या कारकिर्दीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

अशीच वेळ सेलेब्रेटी स्त्रियांच्या नवऱ्यांवरही येत असतेच, परंतु समाज एकूणच पुरुषांच्या कोणत्याही वर्तनाकडे, बोलण्याकडे शक्यतो डोळेझाक करत असतो. स्त्रिया मात्र कसंही वागल्या तरी टीकेच्याच धनी होत असतात.

त्यामुळे अशा सेलेब्रेटीच्या जीवनसाथींबद्दल वाचणं खूप काही शिकवून जाणारं असतं. या कथांमधनं हे सेलेब्रेटी म्हणजे तुमच्या-आमच्यासारखी हाडामांसाची माणसंच आहेत, हे जसं दिसतं; तसंच आपण समाज म्हणून कसं वागलो, कसं वागू शकलाे असतो, याचा आरसा या जीवनकथांतून दिसत असतो. रमाबाईंबद्दलची कव्हर स्टोरी त्या दृष्टीतनं पाहायला हवी.

mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...