आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साठवणीवर डल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंधरा दिवस झालेत, हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर होऊन. पहिले एकदोन दिवस तर म्हणजे नक्की काय झालंय, ते कळण्यात गेले. मग जेव्हा टकुऱ्यात प्रकाश पडला की, सध्या हातात असलेल्या नोटांची किंमत कागदाएवढीच आहे, वर काेणताही आकडा छापलेला असो, तेव्हा आपण सगळे बँकेत धावलो. नोटा बदलून घ्यायला आणि घरात असलेल्या हजारपाचशेच्या नोटा जमा करायला. यासाठी अर्थात बँकेत खातं असायला हवं. ते आपल्यापैकी अनेकांचं आहेच म्हणा. पण अशा अनेक जणी आहेत, ज्यांचं खातं नाही पण ज्यांच्याकडे कष्टाचा कमावलेला ‘पांढरा’ पैसा आहे, जो त्यांनी घरी ठेवला होता. अनेकींनी डब्यांमधनं, कपाटाच्या खणांमधनं, जुन्या पाकिटांमधनं, रुमालात बांधून या नोटा जपून ठेवलेल्या, अडीअडचणीला उपयोगी येतील म्हणून. त्यांनी घरातल्यांपासून लपवून ठेवले होते हे पैसे. नाहीतर दारुड्या नवऱ्याने वा मुलाने कधीच खर्चून टाकले असते. पण, अचानक अंगावर आदळलेल्या या निर्णयामुळे या बाया घाबरून गेल्या, त्यांना वाटलं, आता आपल्या पैशाची किंमत शून्य.

एकदा माणूस घाबरला की, नीट विचार करू शकत नाही. बरं, हे पैसे लपवून ठेवलेले त्यामुळे कुणाला विचारावं त्याच्याबद्दल, हेही त्यांना कळेना. नवऱ्यांना साधारण अंदाज असतोच बायको थोडेफार पैसे लपवून साठवून ठेवते याचा. त्यामुळे, हा निर्णय जाहीर झाल्यानंतर या बायांना या नोटा नवऱ्यांच्या हवाली कराव्या लागल्या, खात्यात जमा करण्यासाठी किंवा बदलून आणण्यासाठी. आता एकदा पैसा त्याच्या खात्यात गेला की, तो काही यांच्या हातात येत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. पण करतात काय?

त्या थोडं थांबल्या असत्या, बँकेत स्वत:चं खातं उघडलं असतं नि त्यात या नोटा जमा केल्या असत्या तर? तर पैसेही वाचले असते आणि उघडलेल्या खात्यात पैसे बचतही करता आले असते नंतर. पण घाबरलेल्या अवस्थेत हे कुठलं सुचायला? त्यांना हे सुचलं नाही, इतरही कुणाला लक्षात आलं नाही की, भारतासारख्या पुरुषप्रधान देशात लाखो महिलांवर अशी वेळ येणार आहे?

मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...