आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकातली ती्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परीकथांमधल्या पऱ्या, राक्षस, चेटकीण, सिंड्रेला, रापुंझेल, अॅलिस, गोट्या, फास्टर फेणे, धाडसी चंदू, हॅरी पाॅटर, फेमस फाइव्ह, सीक्रेट सेव्हन... ही यादी न संपणारी. आपल्या मोठं होण्याचा, व्यक्ती म्हणून होणाऱ्या प्रवासाचा अविभाज्य घटक असलेली ही पात्रं. फक्त पुस्तकातनं आपल्या भेटतात, पण आपल्यासाठी ती खरीखुरी माणसं असतात. त्यांच्यासोबत आपण हसतो, रडतो, धडपडतोही. पुस्तक वाचून संपलं तरी ती मात्र आपल्यापाशीच राहतात, अनेक दिवस, महिने, वर्षं. उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, अशा मनात दडून राहिलेल्या पुस्तकांतल्या ‘ती’विषयीचा हा मधुरिमाचा विशेषांक. प्रेमाने आणि आपुलकीने त्यांची ओळख करून देणारा.
 
नायिका, हिराॅइन, म्हटली की बहुतकरून सिनेमातलीच डोळ्यांसमोर येते. पण पुस्तकांमध्येही नायिका असतात आणि त्या जास्त मौजेच्या वाटतात; कारण लेखकांनी केलेल्या वर्णनाबरहुकूम का होईना, पण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून त्या आपल्यासमोर उभ्या राहतात. सिनेमातली नायिका कशी दिसते, कशी बोलते, चालते ते आपल्याला दिसत असतं, आपल्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला तिथे वावच नसतो. पण पुस्तकातली नायिका मात्र वेगळी असते. आपल्याला हव्या त्या आवाजात ती बोलू शकते. आपल्याला हवे ते कपडे ती लेऊ शकते. अनेकदा आपण ती झालेलो असतो, म्हणूनच आपण पुस्तक वाचतावाचता हसतो, रडतो, चिडतो. कधी आपल्याला तिच्यासारखंच व्हायचं असतं, तिचा लढा आपल्याला स्फूर्ती देत असतो. तिची सुखदु:खं, तिचे संघर्ष, तिचं यशापयश आपण तिच्यासोबत भाेगत, उपभोगत असतो. प्रकाश नारायण संत यांच्या लंपनची मैत्रीण सुमी असो की, अजिता काळे यांची मर्ल; जेके रोलिंग यांची हर्मायनी (हॅरी पाॅटर मालिका) असो की, मार्गरेट मिशेल यांची स्कार्लेट ओ’हारा (गाॅन विथ द विंड); पुशि रेगे यांच्या सावित्री वा रेणू असोत की, गौरी देशपांडे यांच्या नर्मदा, कालिंदी, सुहास, मालविका; नोबोकोव्हची लोलिता असो की, खालिद हुसैनी यांच्या मरियम व लैला (अ थाउजंड स्प्लेंडिड सन्स); वि. स. खांडेकरांची देवयानी असो की, जयवंत दळवींची महानंदा; शरच्चंद्र चतर्जींच्या अन्नपूर्णा, पारो, चंद्रमुखी असोत की, रवींद्रनाथ टागोरांची मिनी (काबुलीवाला). या सगळ्या जणी आपल्या भावविश्वाचा एक मोठा भाग बनून गेलेल्या अाहेत. त्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत, पूर्वीही नव्हत्या, भविष्यात येण्याची शक्यता नाही; पण वाचकांसाठी त्या खऱ्याच आहेत. आजचा मधुरिमाचा अंक आहे, उद्याच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून काढलेला. पुस्तकातली ती, हे या अंकाचं केंद्रस्थळ. पुस्तकातली ही ‘ती’ कालातीत असते. ती अनेक पिढ्यांचं रंजन करते, वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांना वेगवेगळं काही सांगत राहते, त्या तिच्याकडनं वेगवेगळं काही घेत राहतात. असंही असू शकतं की, आपली अनेक ‘ती’शी ओळख नसते झालेली. सगळीच पुस्तकं आपण वाचू शकत नसतोय ना?  मग अशी कोणती ‘ती’ आहे, जी तुम्हाला आवडू शकते, जिची ओळख तुम्ही करून घ्यायलाच हवी? अशा काही नायिकांची ओळख आजच्या अंकात करून देतोय. त्या सगळ्याच काही लढाऊ, स्फूर्तिदायक, कणखर, सशक्त वगैरे नाहीत. त्यांना आज या अंकात जागा मिळालीय, कारण त्या सच्च्या आहेत. त्यांना पूर्ण माणूस व्हायचंय, भल्याबुऱ्यासकट. ‘नातिचरामि’ या मेघना पेठे यांच्या कादंबरीतील मीराला विवाहसंस्थेबद्दल अनेक प्रश्न पडलेत. त्यांची उत्तरं ती शोधतेच आहे, पण वाचतावाचता आपल्यालाही हे प्रश्न पडत जातात आणि आपण आपल्यापुरती त्यावरची उत्तरं शोधू लागतो.  वुई द लिव्हिंग या आयन रँड यांच्या कादंबरीतील किरा तत्त्वांना धरून राहणारी, निखळ प्रेम करणारी, साम्यवादी विचारसरणीशी शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत झगडणारी.  रात्र काळी घागर काळी या चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या कादंबरीतील लक्ष्मी, लावण्यवती आणि त्या सौंदर्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करणारी. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथा व कादंबऱ्यांमधल्या अनेक नायिका वरवर साध्या, सामान्य वाटणाऱ्या. पण त्याही त्यांच्या परीने त्यांचा त्यांचा ठसा उमटवतच आल्या आहेत. तुमची लाडकी ती कोण आहे, त्याचा मागोवाही या निमित्ताने घेता येईल तुम्हाला. कारण नुसतं वाचलं आणि विसरलं, इतकं सोपं नसतं ना. वाचून आपलीही विचारचक्रं फिरायला लागतातच. वाचताना कोण आठवलं, तिच्याबद्दल आम्हाला कळवलंत तर आम्हाला आणि इतर वाचकांनाही तिची ओळख करून घ्यावीशी वाटेल आणि ही वाचनानंदाची साखळी अशीच पुढे सुरू राहील. 

जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक, लेखक मैत्रिणींना मधुरिमा टीमच्या वतीने खूप शुभेच्छा.
 
mrinmayee.r@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...